उपाध्यक्षपदाची लॉटरी कोणाला?
By admin | Published: June 29, 2015 10:32 PM2015-06-29T22:32:58+5:302015-06-30T00:22:31+5:30
‘कृष्णा’साठी निवडी शनिवारी : अध्यक्षपदी सुरेश भोसले निश्चित; उपाध्यक्षपदासाठी अनेकांची नावे चर्चेत
प्रमोद सुकरे -कऱ्हाड -नुकत्याच पार पडलेल्या यशवंतराव माहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा एकदा संत्तांतर झाले. डॉ. भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने १५ जागा जिंकल्या आहेत. शनिवार, दि. ४ जुलै रोजी अध्यक्ष-उपाध्यक्षपदांची निवडी होणार असून, डॉ. सुरेश भोसले यांची अध्यक्षपदी निवड निश्चित मानली जाते.
कारखान्याच्या इतिहासात प्रथमच तिरंगी लढत झाली. सत्ताधारी अविनाश मोहिते यांचे ‘संस्थापक’ पॅनेल, डॉ. इंद्रजित मोहिते यांचे ‘रयत’ पॅनेल व डॉ. सुरेश भोसले यांचे ‘सहकार’ पॅनेल अशी लढत होऊन सहकार पॅनेलने १५ तर संस्थापक पॅनेलने ६ जागा मिळविल्या आहेत. सहकार पॅनेलचे नेतृत्वच डॉ. सुरेश भोसले यांनी केले असल्याने तेच कारखान्याचे पुन्हा एकदा अध्यक्ष होणार, हे निश्चित !
कारखान्याचे उपाध्यक्षपद हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. त्यासाठी अनेकजण इच्छुक असले तरी त्याची लॉटरी कोणाला लागणार, याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता आहे. उपाध्यक्षपदासाठी कऱ्हाड तालुक्यात माजी जिल्हा परिषद सदस्य जगदीश जगताप व पंचायत समितीतील विरोधी पक्षनेते धोंडिराम जाधव यांची नावे चर्चेत आहेत. तर वाळवा तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य जितेंंद्र पाटील व सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांची नावे चर्चेेत आहेत. कारखान्याच्या इतिहासात अपवाद वगळता उपाध्यक्षपद वाळवा तालुक्याकडेच राहिले आहे. पण यावेळी पुन्हा एकदा नवा अपवाद होऊन उपाध्यक्षपदाची लॉटरी कऱ्हाड तालुक्याला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
४वाळवा तालुक्यातील भोसले गटाचे संचालक जितेंद्र पाटील हे दुसऱ्यांदा कारखान्यावर संचालक म्हणून निवडून आले आहेत. ते काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य व जयंत पाटलांचे विरोधक म्हणूनच त्यांना ओळखले जाते. जयंत पाटील समर्थक म्हणून ओळखले जाणारे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील हे प्रथमच संचालक म्हणून निवडून आले आहे. वाळव्याचा विचार झाल्यास कोणाला पसंती मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
बाजार समितीची निवडणूक डोळ्यासमोर !
कऱ्हाडला शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आॅगस्ट महिन्यात होऊ घातली आहे. ही निवडणूक नव्या मैत्रिपर्वाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका ‘दादा’ संचालकाला उपाध्यक्षपदाची संधी देऊन बाजार समितीच्या आखाड्यात एखादी चाल खेळली जाऊ शकते.