कोण करतंय भटकंती तर कोण खेळतंय क्रिकेट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:37 AM2021-05-15T04:37:29+5:302021-05-15T04:37:29+5:30
सातारा : दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र साताऱ्यात संचारबंदीच्या नियमावलीचे नागरिकांकडून ...
सातारा : दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र साताऱ्यात संचारबंदीच्या नियमावलीचे नागरिकांकडून पालनच केले जात नाही. घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले असताना बहुतांश नागरिक सकाळी व सायंकाळी घराबाहेर भटकंतीसाठी पडत आहेत. रात्री गल्लीबोळात तरुणांकडून क्रिकेटचे सामने केले जात आहेत. फिजिकल डिस्टन्स व मास्क वापरण्याची तसदीही कोणी घेत नसल्याने कोरोना संक्रमण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
सातारा जिल्ह्यासह शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. हे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे निर्बंध अधिक कठोर केले आहेत. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच केवळ अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा दिली आहे. मात्र नागरिक खोटी कारणे सांगून घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे शहरात नागरिक व वाहनधारकांची दररोज गर्दी पहायला मिळत आहे. संचारबंदी केवळ कागदावर उरली असून, नागरिकांकडून एकाही नियमाचे पालन केले जात नाही. प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांचे म्हणावेत असे पाठबळ व सहकार्य मिळत नसल्याने कोरोनाची साखळी तुटणार तरी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्ते बॅरिकेड करून बंदिस्त करण्यात आले आहेत. सुरक्षिततेसाठी प्रमुख चौकांमध्ये पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. असे असतानाही बहुतांश नागरिक सकाळी व सायंकाळी घराबाहेर फेरफटका मारत आहेत. रात्री गल्लीबोळात तरुणांकडून क्रिकेटचे सामने खेळले जात आहेत. अनेक ठिकाणी तरुणांचे टोळके एकत्र येऊन गप्पा मारतानाही दिसत आहे. दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल करूनही नागरिक व वाहनधारकांवर कोणताही परिणाम होत नसल्याने आता प्रशासनही हतबल झाले आहे.
(चौकट)
जबाबदारीचे भान ठेवा..
कोरोनामुळे आज कोणाचे मातृछत्र हरपले आहे तर कुणाचे पितृछत्र. अनेकजण आपली जवळची व्यक्ती गमावू लागला आहे. अशी परिस्थिती कधीच कोणावर ओढावू नये असे जर आपल्याला वाटत असेल तर आपण सर्वांनी जबाबदारीने वागायला हवे. शासन नियमांचे काटेकोर पालन करून आपण स्वतःला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायला हवे. तरच कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल.