साताऱ्याचा ऐतिहासिक राजवाडा जपणार तरी कोण?, इतिहासप्रेमींचा सवाल
By सचिन काकडे | Published: August 30, 2023 12:42 PM2023-08-30T12:42:31+5:302023-08-30T12:42:52+5:30
देखणी वास्तू देखभालीअभावी केविलवाणी
सचिन काकडे
सातारा : मराठा साम्राज्याच्या चौथ्या राजधानीचा मान मिळवणाऱ्या सातारा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा येथील राजवाडा त्यांपैकीच एक. देखभालीअभावी ही वास्तू केविलवाणी झाली असून, वाळवीने पोखरत चाललेला हा इतिहास जपणार तरी कोण, असा सवाल इतिहासप्रेमींमधून उपस्थित केला जात आहे.
राजवाडा या वास्तूत पूर्वी न्यायालय आणि सरकारी कार्यालये होती, तोपर्यंत देखभालीचा प्रश्न नव्हता; परंतु कालांतराने न्यायालय आणि नंतर सरकारी कार्यालये अन्य वास्तूंत स्थलांतरित झाली आणि या ऐतिहासिक वास्तूची रया जाण्यास सुरुवात झाली. सरकारने न्यायालय आणि कार्यालयांसाठी ही इमारत राजघराण्याकडून भाडेपट्ट्याने घेतली होती. कार्यालये स्थलांतरित झाल्यानंतर या इमारतीचा ताबा आणि विनियोग यांबाबत बरेच मंथन झाले. मात्र अद्याप निष्पन्न काहीच झालेले नाही.
राजवाड्याची दर्शनी इमारत तीनमजली असून, आत गेल्यावर एक चौक आणि प्रचंड मोठा दरबार हॉल आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना दुमजली इमारती असून, मराठा पद्धतीच्या कोरीव लाकूडकामाने घडविलेली अनेक दालने आहेत. दरबार हॉलच्या तीन बाजूंना बांधीव दगडी कारंजी असून, पाणी खेळविणारे जुने तांब्याचे किमती पाइप आज दिसत नाहीत. मधल्या काळात राजवाड्यातील कित्येक वस्तू गायब झाल्या.
आता पाऊस-पाणी व देखभालीअभावी ही वास्तूू जीर्ण होऊ लागली आहे. भिंतींना तडे जाऊ लागले आहेत. वाळवी हा वाडा हळूहळू पोखरू लागली आहे. या वाड्याभोवती विघ्नसंतोषींचा वावर वाढू लागला आहे. त्यामुळे इतिहासाचा मूक साक्षीदार असलेल्या या वास्तूचे जतन करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना...
- राजवाडा इमारतीतील एक दालन मराठा आर्ट गॅलरीला देण्यात आले होते. या दालनाला आता कुलूप आहे.
- राजवाड्यातील लाकूडकाम अत्यंत दुर्मीळ असून, महिरपींच्या दोन्ही बाजूंना केळफूल कोरण्याची खास मराठा शैली यात आढळते.
- येथील दगडी कारंजी हा जुन्या तंत्रज्ञानाचा एक उत्कृष्ट पुरावा आहे. या आवारात न्यायालय होते, तेव्हा अनेकजण या तंत्रज्ञानाचा अनुभव घेत होते.
पुणे, नाशिक येथील ऐतिहासिक वाड्यांची प्रचंड वाताहत झाली होती. मात्र, शासनाने दखल घेत हा ऐतिहासिक ठेवा पुन्हा जसाच्या तसा उभा केला. राजधानीचे शहर असलेल्या साताऱ्यातील राजवाड्याची अवस्थाही दयनीय झाली आहे. सातारकरांनी पुढाकार घेऊन हा राजवाडा जपायला हवा. त्याच्या संवर्धनासाठी पुढे यायले हवे. - नीलेश पंडित, कार्याध्यक्ष, जिज्ञासा इतिहास संशोधन, संवर्धन संस्था