जो तो म्हणे...मला पण व्हायचंय ‘मेहरबान’

By admin | Published: October 27, 2016 11:24 PM2016-10-27T23:24:41+5:302016-10-27T23:24:41+5:30

पालिका निवडणूक : पक्षातून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव; पक्ष, आघाडी कार्यालयात मुलाखतींना सुरुवात

Who would say that ... I want to be 'happy' | जो तो म्हणे...मला पण व्हायचंय ‘मेहरबान’

जो तो म्हणे...मला पण व्हायचंय ‘मेहरबान’

Next

कऱ्हाड : सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून समाजकार्य करणाऱ्या व गरिबांना वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप करून आशीर्वाद मिळवणाऱ्या प्रभागातील अनेक इच्छुकांना ‘मेहरबान’ होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळेच मागचा पुढचा विचार न करता सोबत असलेल्या शंभर ते दोनशे कार्यकर्त्यांच्या पाठबळावर मला पण व्हायचंय ‘मेहरबान’ असे म्हणत इच्छुक आपले उमेदवारी अर्ज भरत आहेत.
कऱ्हाड पालिका निवडणुकीची दिवसेंदिवस रंगत अजूनच वाढत आहे. पक्ष, आघाडीतील विद्यमान नगरसेवकांकडून अद्यापही अर्ज भरले गेले नसल्याने अर्ज भरून आपणच ‘मेहरबान’ होऊ या, असे सांगत इच्छुकांकडून मात्र, अर्ज भरले जात आहेत. आॅनलाईनद्वारे अर्ज भरण्यास सांगितले असल्याने नवख्या इच्छुक उमेदवारांना ते सोपे जात आहे. त्यासाठी काहीजण रात्रीची वेळ निवडत आहेत. दिवसभर संबंधित विभाग प्रमुखांच्या स्वाक्षऱ्या घेऊन अर्ज भरण्यासाठी रात्री शांत वातावरणाची वेळ निवडत आहेत.
२९ प्रभाग असलेल्या व सुमारे ५७ हजारांहून अधिक मतदार असलेल्या कऱ्हाड पालिकेत जो-तो नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अर्ज भरू लागला आहे. पालिका निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी इच्छुकांचा वाढता सहभाग विचारात घेता ‘मेहरबान’ही चिंताग्रस्त झाले आहेत. आपल्यासोबत कोण आणि आपल्या विरोधात कोण याबात अजूनही त्यांच्यात संभ्रमावस्ता आहे.
मागील मेहरबानांनी काय कामे केली. आपल्याला एकदा संधी द्या मग काय करून दाखवतो, असे सांगत इच्छुक आपल्या शंभर ते दोनशे कार्यकर्त्यांसह पालिकेत अर्ज भरण्यासाठी दाखल होत आहेत. अंगावर पांढरा खादी शर्ट आणि पांढरी पॅन्ट चढवून रूबाबात अर्ज भरण्यासाठी इच्छुक पालिकेत दाखल होत आहेत. अर्ज भरण्यासाठी दोनच दिवस अवधी बाकी राहिल्याने इच्छुकांकडून अर्ज भरण्यासाठी गर्दी केली जात आहे. अगोदर अर्ज तरी भरूया कोणत्या पक्षातून उभं राहायचं ते नंतर बघू, असे इच्छुक सांगत आहेत. (प्रतिनिधी)
खादी शर्ट अन् हातात ब्रॅन्डेड मोबाईल !
गल्लीतील सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांची मने जिंकणाऱ्या ‘दादा’, ‘बाबा’ तसेच ‘भाई’ अशी ओळख असलेल्यांकडून आपला उमेदवारी अर्ज भरला जात आहे. अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार अंगावर खादी शर्ट अन् हातात ब्रॅन्डेड मोबाईल घेऊन शंभर ते दोनशे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पालिकेत येत आहेत.
सायबर कॅफेत वाढली गर्दी
कऱ्हाड पालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांकडून चांगलीच गर्दी केली जात आहे. आॅनलाईनद्वारे अर्ज भरणे बंधनकारक असल्याने इच्छुकांकडून सायबर कॅफेत गर्दी केली जात आहे. त्यामुळे सायबर कॅफेवाल्यांचाही चांगला व्यवसाय होत आहे.
रोज शंभर ते दोनशे कार्यकर्त्यांसाठी चहा, नाष्टा
इच्छुक उमेदवारांकडून आपल्यासोबत आपले कार्यकर्ते राहावेत म्हणून त्यांच्यासाठी चहा, नाष्ट्याचीही सोय करीत आहेत. तर काहीजणांकडून हॉटेल व धाब्यांवर जेवणेही दिली जात आहेत.


 

Web Title: Who would say that ... I want to be 'happy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.