मोडले सारे घर... पण मोडला नाही कणा..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:35 AM2021-08-01T04:35:38+5:302021-08-01T04:35:38+5:30
आभाळ फाटलं अन् होत्याचं नव्हतं झालं. त्या काळरात्री जीवाभावाची माणसं मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. काही पाण्याच्या लोटात वाहून गेली. या ...
आभाळ फाटलं अन् होत्याचं नव्हतं झालं. त्या काळरात्री जीवाभावाची माणसं मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. काही पाण्याच्या लोटात वाहून गेली. या अस्मानी संकटातून जी जगली त्यांना जगण्याचं बळ देण्याचं काम जिल्हा प्रशासनानं तत्काळ हाती घेतलं. जिथे रस्ते वाहून गेले होते, त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात रस्ते तयार करुन मदतकार्य पोहोचविण्याचं काम हाती घेण्यात आलं. पाण्यात बोटी घालून बाधितांपर्यंत मदत पोहोचवली. आता ‘मोडले सारे घर... पण मोडला नाही कणा... पाठीवरती हात ठेवून फक्त लढा म्हणा...’ या कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती बाधितांच्या ओठावर तरळत आहेत!
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अत्यंत वेगाने यंत्रणा हलवल्याने मोठ्या संकटातही लोकांपर्यंत मदत पोहोचवता आली. पाटण तालुक्यातील आंबेघर, ढोकावळे, मिरगाव, वाई तालुक्यातील जोर, जांभळी, देवरुखवाडी (कोंढवली) याठिकाणी झालेल्या भूस्खलनात स्थानिक लोक, त्यांची जनावरे डोंगरउतारावरुन पाण्याबरोबर वाहून आलेल्या चिखलराडीत जमिनीखाली दबली गेली. अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे महाबळेश्वर तालुक्यातील ११३पैकी ६७ गावांमध्ये आजपर्यंत संपर्क झाला आहे. पण ५६ गावांमध्ये अद्याप जाता येत नाही, तर उरलेल्या दहा गावांमध्ये कोणत्याही मार्गाने पुढील काही दिवस पोहोचता येणार नाही, अशी स्थिती आहे. जिल्हा प्रशासनाने सर्वच ठिकाणी यंत्रणा वेगाने राबवली.
कोल्हापुरात महामार्गावर पाणी आले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. तेव्हा आनेवाडी टोलनाक्यावर वाहने अडकून पडली होती. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर वाहनचालक, क्लिनर यांची उपासमार होऊ नये, यासाठी चव्हाण यांनी याठिकाणी जाऊन फूड पॅकेट्स दिली.
संगीता राजापूरकर पाेहोचल्या चतुरबेटमध्ये...
कुंभरोशी ते महाबळेश्वर या मार्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने हा मार्ग पुढील महिनाभरात सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. चतुरबेट या दुर्गम गावात गुरुवार, दि. २९ रोजी वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले या गावाबाहेरच्या प्रशासनाच्या त्या दहा-बारा दिवसानंतर पोहोचलेल्या पहिल्या व्यक्ती होत्या. तेथील ग्रामस्थांना भेटून त्यांना आधार दिला. जोर, जांभळी अन् देवरुखवाडीतदेखील राजापूरकर यांनी भरपावसात उभे राहून मदतकार्य पोहोचवले.
जिल्हाधिकारी शेखर सिंह चिखल तुडवत आंबेघरमध्ये
पाटण तालुक्यातील आंबेघर या गावात भूस्खलनामुळे १५ ग्रामस्थांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह हे तत्काळ आंबेघरला गेले. विशेष म्हणजे धावडी गावापासून पुढे जाता येत नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी चिखल तुडवत आंबेघरमध्ये पोहोचले.
तहसीलदार रणजित भोसले यांचा सजग प्रयत्न
जोर खोऱ्यात मोठे नुकसान झाले असून, अजूनही हा भाग संपर्कहीन आहे. या भागात संपर्क पुनर्प्रस्थापित करणे व पुनर्वसनाच्या कामाला प्रशासनाने फार महत्त्व देऊन जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरुच आहे. वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी बोटीतून जाऊन लोकांना मदतकार्य पोहोचवले.
तुमच्या कष्टामुळे... आम्ही प्रकाशाच्या गावात राहतो
सातारा जिल्ह्यात मागच्या दोन-तीन दिवसात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे वीज... अनेक ठिकाणी तारा तुटणे, पोल वाहून जाणे अशा घटना घडल्या आहेत. हे सर्व पूर्ववत करण्यासाठी जिवाची पर्वा न करता विद्युत विभागाचे कर्मचारी काम करत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.
फोटो...३१ सागर