कोणाचं हेल्मेट अडगळीत तर कोणाचं गंजलेलं...
By Admin | Published: July 23, 2016 11:17 PM2016-07-23T23:17:52+5:302016-07-23T23:48:21+5:30
वापरण्याचा कंटाळा : पेट्रोल भरण्यासंदर्भातील अटींना तरुणांचा कडाडून विरोध
सातारा : हेल्मेट सक्ती करूनही अंमलबजावणी होत नसल्याने राज्य शासनाने हेल्मेटशिवाय पेट्रोल मिळणार नाही, असे फर्मान सोडले आहे. परंतु, अजूनही हेल्मेट वापरण्याची कोणाची मानसिकता दिसत नसल्याचे जाणवत आहे. यासंदर्भात विचारणा केली तर ‘हेल्मेट आहे पण माळावर ठेवले आहे,’ ‘त्याची काच फुटली आहे,’ अशी सबबी सांगण्यात आली.
रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातून दुचाकी अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर हेल्मेट वापरले नव्हते म्हणून मृत्यू ओढावल्याच्या घटना सतत घडत आहेत. त्यामुळे हेल्मेट सक्तीचा वारंवार निर्णय घेतला जातो; पण प्रत्यक्षात मानसिकता अद्याप झालेली नसल्याचे जाणवत आहे.
यापूर्वी झालेल्या सक्तीच्या काळात वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई केली जात होती. त्या काळात बहुतांश दुचाकीस्वारांनी हेल्मेट खरेदी केली आहे. तर त्यानंतर अनेक दुचाकी शोरूम चालकांनी गाड्या विकतानाच हेल्मेटही देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘हेल्मेटशिवाय पेट्रोल नाही,’ या निर्णयानंतर ‘लोकमत’ने सातारा शहरातील पेट्रोल पंपावर फेरफटका मारला असता भन्नाट अनुभव आला.
घरात हेल्मेट आहे. पण लांब पल्ल्याच्या प्रवासातच ते वापरले जात आहे. हेल्मेट नसेल तर पेट्रोल मिळणार नाही, याची माहिती प्रसारमाध्यमांतून समजल्यानंतर काही दुचाकीस्वारांनी अडगळीतील हेल्मेट बाहेर काढून वापरण्यास सुरुवातही केली आहे, हे पेट्रोलपंपांवर गेल्यावर दिसून येत होते.
ज्यांनी हेल्मेट वापरले नव्हते. त्यांच्याशी चर्चा केली तर बोलण्यास कोणीही तयार नव्हते. काहीजण बोलले पण त्यांचा कारणही तसेच देऊर सावरासावर करण्याचा प्रयत्न चालला होता. (प्रतिनिधी)
कारणेही तयार..
हेल्मेट आहे पण घरात आहे. मंडई खरेदीला आलो होतो. तेवढ्यात पेट्रोल संपले. म्हणून तसाच आलो आहे.
माळावर ठेवून दिले होते. घरचे बाहेरगावी गेलेत. काढून द्यायला कोणी नसल्यामुळे नाही आणलं.
चार दिवसांपूर्वीच हेल्मेटची काच फुटली. ती खाली लोंबकळत असल्याने दुरुस्त करावे लागणार आहे.
घरात एकच हेल्मेट आहे. पण वडिलांनी नेल्यामुळे आणता आले नाही.
धंदा करायचा
का नाही
यासंदर्भात पेट्रोल भरणाऱ्याकडेच विचारणा केली असता ते म्हणाले, ‘हेल्मेट वापरले पाहिजे हे भल्यासाठीच आहे. त्यासाठी पोलिसांनी दंड करावा. आम्ही पेट्रोल नाही दिले तर दुसरे कोणी तरी देईल. आम्ही धंदा करायचा का नाही?