जिसकी ताकद बडी.. उसका ‘तिकीट’ फिक्स!
By admin | Published: January 24, 2017 11:34 PM2017-01-24T23:34:59+5:302017-01-24T23:34:59+5:30
चुरस वाढली : निवडून येण्याच्या निकषाबाबत सर्वच पक्षनेते ठाम
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या आगामी निवडणुकीचा जोरदार धुरळा उडाला आहे. राष्ट्रवादी, काँगे्रस, भाजप, शिवसेना या प्रमुख पक्षांकडे निवडणूक इच्छिणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी असली तरी चुरस वाढली असताना निवडून येण्याचा निकष लक्षात घेऊनच उमेदवारी देण्याचा अजेंडा सर्वच पक्षांतील नेतेमंडळींनी राबविला आहे. त्यामुळे ‘जिसकी ताकद बडी...उसका तिकीट फिक्स!,’ असेच धोरण सर्वच पक्षांत पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाभर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितींमध्ये वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाने सर्वप्रथम आघाडी घेत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या पक्षाकडून लढण्यासाठी ७५० उमेदवार इच्छुक आहेत. सुरुवातीला हा आकडा मोठा वाटत होता. त्यामुळे बंडखोरीचे दुखणे राष्ट्रवादीलाच जास्त झळ पोहोचवेल, असे चित्र होते. पण उमेदवारी मागणाऱ्यांची हीच गर्दी भाजप व शिवसेनेतही आहे. शिवसेनेने काही दिवसांपूर्वी ७१५ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. भाजपनेही तालुका पातळीवर मुलाखती घेतल्या होत्या. भाजप येत्या २५ जानेवारी रोजी अंतिम यादी जाहीर करणार आहे. साहजिकच, उमेदवारी मागणाऱ्यांची मोठी गर्दी सर्वच पक्षांकडे पाहायला मिळते. या उमेदवाऱ्या देताना स्थानिक राजकारणाचा विचार केला जातो. गावपातळीवर आर्थिक, सामाजिक व राजकीय या सर्व बाबींनी जो सक्षम असतो, त्यालाच उमेदवारी दिली जाते. मागील निवडणुकांचा इतिहास पाहता राष्ट्रवादी विरोधात काँगे्रस असे दुतर्फी युद्ध होत होते. भाजप, शिवसेना एखाद्या दुसऱ्या जागी यशस्वी झाली होती. मात्र, यंदाची निवडणूक वेगळी आहे. राज्यातील आघाडी सरकार गेल्याने राष्ट्रवादी व काँगे्रस यांच्या व्यतिरिक्त भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना हे पक्षही आक्रमक झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात शिरकाव करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता आणणे, बंधनकारक असल्याने केंद्र व राज्यात सत्तेवर असणाऱ्या सत्ताधारी महायुतीनेही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. या निवडणुकीत ठकास-महाठक उमेदवार देण्याची तयारी सर्वच राजकीय पक्षांची केली असल्याचे चित्र दिसत आहे. (प्रतिनिधी)