"काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार बाहेर काढणारे अण्णा हजारे मोदी सरकारच्या काळात गप्प का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 03:41 PM2021-07-17T15:41:45+5:302021-07-17T16:57:13+5:30
anna hazare Satara : सध्या त्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध काम करायचे नाही वाटते. भाजपाच्या काळात होणारा अफाट भ्रष्टाचारविरोधात आम्ही मैदानात उतरु.
सातारा : काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार बाहेर काढणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारच्या काळात इतके भ्रष्टाचार बाहेर निघाले तरी अण्णा हजारे गप्प का आहेत? असा खडा सवाल इंडिया अगेन्स्ट करपशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला. शेतकऱ्यांचे आंदोलन गेल्या आठ महिन्यांपासून दिल्लीत सुरु असून, आजवर अण्णांनी त्याविरोधात एक शब्दही का काढला नाही? असेही त्यांनी विचारले.
हेमंत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे अनेक मुद्यांवर मते मांडली. ते पुढे म्हणाले, दिल्लीत शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नाबाबत अनेक महिन्यांपासून आंदोलन चालू आहे. अण्णा हजारे यांनी 'शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर अंदोलन करु' असे सांगितले. पण भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि त्याचे सहकारी राळेगणसिद्धी येथे भेटुन गेले की अण्णा हजारेंनी भूमिका बदलली.
सध्या त्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध काम करायचे नाही वाटते. भाजपाच्या काळात होणारा अफाट भ्रष्टाचारविरोधात आम्ही मैदानात उतरु. मराठा, ओबीसी, धनगर आरक्षण प्रश्नाबाबत आमचा लढा सुरु राहील.'
आज मोदी सरकार बँकांचे, अनेक शासकीय विभागांचे खाजगीकरण करत आहे. अंबानी-अदाणी यांना देश विकण्याचा घाट मोदी सरकारने घातला आहे. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरने बाहेर येत आहेत. देशात कोरोनासह महागाईचे संकट आलेले आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. तरीही याविरोधात अण्णा हजारे मौन धारण करून बसले आहेत. भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर १०० रुपयांवरील चलन बंद करायला हवे. तसेच रोखीने व्यवहार बंद व्हावेत आणि आधार लिंकशिवाय व्यवहार होऊ नयेत. या तीन गोष्टींची अंमलबजावणी केली तर भ्रष्टाचार संपवायला मदत होईल," असेही हेमंत पाटील यांनी सांगितले.
"भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली पात्रता ओळखून भाष्य करावे. तोंडाला येईल ते बोलून स्वतःचा पचका करून घेऊ नये. शरद पवार, अजित पवार यांच्यावर बोलताना त्यांची अनेकदा जीभ घसरली आहे. बेताल वक्तव्य करून, मोठ्या व्यक्तींवर टीका करून प्रसिद्धी मिळविण्याचा हा खोटा प्रकार त्यांनी खेळू नये. अशी बेताल वक्तव्य यापुढेही सुरूच राहिली, तर गाठ आमच्याशी आहे, हे पडळकरांनी लक्षात ठेवावे," असेही हेमंत पाटील यांनी पडळकरांना सुनावले.