भुर्इंजकरांना जमलं मग आपल्याला का नाही?
By admin | Published: May 26, 2015 10:28 PM2015-05-26T22:28:08+5:302015-05-27T00:58:59+5:30
चला बंद करूया कर्णकर्कश आवाज : मृत्यू आणि भांडण-तंट्याचे कारण बनलेल्या डॉल्बीचा तोरा उतरायला हवा--आव्वाज गावाचा... ..नाय डॉल्बीचा !
सातारा : उत्सवाकडे आजकाल केवळ चैन, मौज-मजा म्हणून बघितलं जातं. बेधुंद होऊन स्वत:ला उधळून दिलं जातं. उत्सवामुळं विवेक, संयम वाढीस लागायला हवा; मात्र तो कमी होताना दिसत आहे. डॉल्बीच्या तालावर संघटितपणे अभिव्यक्ती करण्यातून वादाला तोंड फुटते आणि त्यातूनच हाणामारीचे प्रकार उद्भवतात. सोमवार, दि. ८ सप्टेंबर २०१४ रोजी राजपथावर गणेशविसर्जनाची मिरवणूक सुरू असताना डॉल्बीच्या दणक्यानं एका दुमजली इमारती भिंत अंगावर कोसळून तिघांचा मूत्यू झाला होता. ही दुर्घटना कोणीही विसरू शकणार नाही.
शुभकार्यात डॉल्बी वाजविणं योग्य की अयोग्य यापेक्षाही त्याचे दुष्परिणाम किती दूरगामी ठरू शकतात, याची अनेक उदाहरणे घडली आहेत. आणि म्हणूनच भुर्इंजकरांनी डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाला कंटाळून गावात डॉल्बीबंदीचा निर्णय घेतला. मृत्यू अन् भांडणतंट्यांचे कारण बनलेली ‘आवाजाची भिंत’ पाडणं भुर्इंजकरांना जमलं मग आपल्याला का नाही? भुर्इंजमध्ये तीन मंगल कार्यालये आहेत. लग्नसराईत दररोज याठिकाणी विवाहसोहळे पार पडत असतात. भुर्इंज येथील नाक्यापासून ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत काढण्यात येणाऱ्या नवरदेवाच्या मिरवणुकीत वाजणाऱ्या डॉल्बीमुळे या मार्गावरील व्यावसायिक तसेच ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत होते. विशेषत: लहान मुले, वृद्ध व रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाने त्रस्त झालेल्या भुर्इंज ग्रामस्थांनी अखेर ग्रामसभा घेऊन गावात डॉल्बीला बंदीचा निर्णय घेऊन डॉल्बीपेक्षा गावाच्या एकीचा आवाजच जास्त असल्याचे दाखवून दिले.
पोलीस प्रशासनानेही सहकार्याचे बळ दिलेच; परंतु मंगल कार्यालय व घोड्यांचे मालक यांनीही गावाच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. जे भुर्इंजकरांना जमलं ते मनात आणलं तर आपल्यालाही जमू शकतं. आनंददायी उत्सावासाठी एवढं तरी आपण करूच शकतो. (लोकमत टीम)
गावकऱ्यांनो... तुम्हीच घ्या पुढाकार!
भर रस्त्यावर सुरू होतो दणदणाट; तेव्हा कान होतात बधिर. मेंदू होतो सुन्न अन् छातीत वाढते धडधड. तरीही ‘डॉल्बी’ वाजविण्याची अघोरी प्रथा थांबविण्यास आपण नाही तयार. कारण का?... तर म्हणे याच्या विरोधात पुढाकार घेणार कोण?... तर सूज्ञ नागरिकहो... आता तुम्हीच व्हा पुढं अन् पेटवा नव्या चळवळीची मशाल. अर्थात ‘आव्वाज गावकऱ्यांचा... नाय डॉल्बीचा’. भुर्इंजकरांनी जशी ‘डॉल्बी’ला गावात बंदी घातली, तसा निर्णय घेऊन शकता तुम्हीही तुमच्या गावात. मग विचार कसला करताय? उचला मोबाईल. लावा ‘लोकमत’ला अन् कळवा ‘आमचंबी गाव पुढारलेलं हाय बगा!’
दुर्घटनेतून
बोध घेणार कधी?
गेल्या वर्षी सातारा शहरात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना डॉल्बीच्या दणक्याने इमारतीची भिंत अंगावर कोसळून तिघांचा मृत्यू झाला. यानंतर सर्वच स्तरातून डॉल्बी वाजविण्याला तीव्र विरोध झाला. काही गावांमध्ये डॉल्बीबंदीचा निर्णयही झाला; पण दुर्घटना घडल्यानंतर. उत्सव, शुभकार्य वेदनादायी नव्हे तर आनंददायी होण्यासाठी ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’, या म्हणीप्रमाणे आताच विचार करणे गरजेचे बनले आहे.
जिवाची चैन की जिवाशी खेळ?
डॉल्बी वाजविल्यामुळे उत्सव धूमधडाक्यात होतो. मनसोक्त नाचता येतं. आनंद साजरा करता येतो, हा समज युवकांमध्ये रूजू लागला आहे. मात्र, अशा प्रकारे जिवाची चैन करताना आपण लहान मुलं, वृद्ध, रुग्ण यांच्या तसेच उद्भवणाऱ्या भांडणातून आपल्याच मित्रांच्या जिवाशी तर खेळत नाही ना, हा विचार डॉल्बीच्या तालावर नाचणाऱ्यांच्या गावी नसतो.