कुणी सिलिंडर घेता का सिलिंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:37 AM2021-04-13T04:37:35+5:302021-04-13T18:12:23+5:30
Fuel Hike Satara : व्याज दरवाढ व अनुदानाचे बंद झालेले दरवाजे यामुळे गॅस सिलिंडरपासून सामान्य लोक दूर पळून आता घराघरात चुली पेटू लागल्या आहेत, तर विविध कंपन्यांच्या गॅस सिलिंडरच्या गाड्या शहरातील व खेड्यापाड्यातील, गल्लीबोळातील रस्त्यावर सिलिंडर घ्या हो, असे म्हणत फिरताना आढळून येत आहेत.
वडूज : व्याज दरवाढ व अनुदानाचे बंद झालेले दरवाजे यामुळे गॅस सिलिंडरपासून सामान्य लोक दूर पळून आता घराघरात चुली पेटू लागल्या आहेत, तर विविध कंपन्यांच्या गॅस सिलिंडरच्या गाड्या शहरातील व खेड्यापाड्यातील, गल्लीबोळातील रस्त्यावर सिलिंडर घ्या हो, असे म्हणत फिरताना आढळून येत आहेत.
यापूर्वी गॅस कनेक्शन मिळणे महामुश्कील होते. त्याकाळी इंधन म्हणून लाकडाचा वापर सर्रास होत होता. शासनाच्या विविध योजनांमुळे, अनुदान आणि काही वर्गासाठी मोफत गॅस कनेक्शन योजना असल्याकारणाने घरोघरी मातीच्या चुलीचे धुराडे बंद होऊन गॅस पेटू लागले. खटाव तालुक्यात विविध कंपन्याचे मिळून सुमारे ६४ हजार १७३ गॅस कनेक्शन्स सुरू आहेत.
बहुतांश ठिकाणी दुबार सिलिंडर कनेक्शन असल्यामुळे बचत करत सध्या वापर सुरू आहे. यामुळे प्रदूषणमुक्त खेडी झाली होती. सध्या गॅसच्या दराचा भडका आणि अनुदान बंद झाल्यामुळे उलटा प्रवास सुरू झाला. गोरगरीब जनतेला घरगुती गॅस महाग झाल्याने परवडत नसल्याने त्यांनी पर्याय म्हणून चुलीला पुन्हा जवळ केले. शेतमजूर, रोजंदारीवर जाणारे कामगार व अन्य गरीब लोक चुलीवर स्पयंपाक करत आहेत. हॉटेल व्यवसायही कोरोना महामारीमुळे पूर्णतः अडचणीत आला असल्याने कमर्शियल सिलिंडरलाही मागणी थंडावली आहे.
वडूज शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यात विविध गॅस कंपन्यांच्या गाड्या गल्लोगल्ली ग्राहकांना सिलिंडर घेण्यासाठी आग्रह करीत आहेत. मात्र, सिलिंडरचे गगनाला भिडलेले दर आणि कोरोना महामारीमुळे होत असलेली आर्थिक मंदी या कारणाने गॅस वापर काही प्रमाणात कमी करून सरपनाचा वापर करीत चुली पेटवल्या जात आहेत.
गॅस अनुदान बंद झाल्याकारणाने वाढती महागाई पाहता सध्या चुलीवर स्वयंपाक करणे परवडत आहे. त्यामुळे आम्ही गॅस सिलिंडर घेणे जवळपास बंदच केले आहे.
-स्वाती पवार, उंबर्डे, ता. खटाव
आमच्यासारख्या रोजंदारीवर काम करणाऱ्यांसाठी गॅस सिलिंडर नाहीत. शासनाच्या योजना फक्त कनेक्शन देण्यापुरत्या आहेत. त्यानंतर महागडे सिलिंडर कोण घेणार. यामुळे आमच्या घरात चुलीवरच स्वयंपाक होत असतो.
- लक्ष्मण केंगार -
वाकेश्वर