Satara: पैसे न दिल्याने अंगावर डिझेल टाकून पत्नीला पेटविले, पतीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 01:55 PM2024-05-11T13:55:21+5:302024-05-11T13:56:17+5:30
सातारा : पैसे मागून न दिल्याने पतीने चिडून स्टोव्हमधील डिझेल टाकून पत्नीला पेटविले. यामध्ये पत्नी जखमी झाली असून त्यांच्यावर ...
सातारा : पैसे मागून न दिल्याने पतीने चिडून स्टोव्हमधील डिझेल टाकून पत्नीला पेटविले. यामध्ये पत्नी जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सातारा शहरात घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पतीच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी नेहा सूरज माने (वय २३, रा. रामकुंड, सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार सूरज राजू माने याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दि. ९ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास रामकुंड येथील राहत्या घरी हा प्रकार घडला. संशयित सुरज माने याने पत्नी नेहा यांच्याकडे पैसे मागितले. पण, त्यांनी पैसे नाहीत असे सांगितले. यावरून चिडून संशयिताने स्टोव्हमधील डिझेल टाकून काडीने नेहा यांना पेटविले. यावेळी नेहा यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर संशयिताने नेहा यांच्या अंगावर पाणी ओतून आग विझवली.
या आगीत नेहा यांच्या हात, पोट, पायाला भाजले. त्यानंतर संशयिताने पत्नी नेहा यांना रिक्षाने दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सातारा शहर पोलिसांत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस अधिक माहिती घेत आहेत.