डोक्यात पार घालून पत्नीचा खून, पती पसार : चारित्र्याचा संशय, निमित्त पैशांवरून भांडणाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 10:33 PM2018-10-16T22:33:11+5:302018-10-16T22:36:52+5:30
शहरातील माची दगड परिसरात पतीने पत्नीच्या डोक्यात नारळ सोलण्याची पार मारून खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
सातारा : शहरातील माची दगड परिसरात पतीने पत्नीच्या डोक्यात नारळ सोलण्याची पार मारून खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. वैशाली धनंजय खोत (वय ३९, रा. शनिवार पेठ, सातारा) असे मृत महिलेचे नाव आहे. चारित्र्याचा संशय व पैशांच्या कारणावरून झालेल्या भांडणानंतर खून करून पती धनंजय दगडू खोत (वय ५०) पसार झाला आहे.
याबाबत मुलगी सृष्टी धनंजय खोत (वय १७) हिने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून खोत कुटुंबीय शंकराचार्य मठाजवळ शनिवार पेठेत राहत आहे. तिचे वडील धनंजय दगडू खोत (वय ५०) हे रिक्षा चालकाचे काम करीत होते. त्यांचे उत्पन्न तुटपुंजे असल्याने आई वैशाली शिवणकाम व पिठाची गिरणी चालवत होत्या. धनंजय नेहमी वैशाली यांच्या चारित्र्यावर संशय घेत होते. तसेच पैशांच्या कारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती.
सृष्टीने मंगळवारी सकाळी पुस्तके खरेदी करण्यासाठी आईकडे (वैशाली) पैसे मागितले. तिने काही पैसे दिले, उर्वरित पैसे वडील धनंजय यांच्याकडून घेण्यास सांगितले. मात्र, वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे पती-पत्नी दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. दरम्यान, सृष्टी व तिचा भाऊ विक्रांत दोघे महाविद्यालयात गेले.
काही वेळाने भांडणे आणखी जोरात होऊ लागल्याने वैशाली बॅगेमध्ये कपडे भरून माहेरी जाण्यास निघाली. त्यावेळी धनंजयने नारळ सोलण्याची पार तिच्या डोक्यामध्ये मारली. त्यामुळे वैशालीच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊन ती जागेवर मृत्युमुखी पडली. त्यानंतर धनंजय रिक्षा घेऊन घरातून निघून गेला. दुपारी सृष्टी घरात आली, त्यावेळी तिची आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून आक्रोश केल्यानंतर परिसरातील लोकांनी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून लोखंडी पार ताब्यात घेतली असून, आरोपीचा शोध सुरू आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पोरे करीत आहेत.
यापूर्वीही कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न
संशयित आरोपी धनंजय खोत हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, त्याने यापूर्वी त्याच्या पहिल्या पत्नीला त्रास देऊन जीवे मारले होते. तसेच काही वर्षांपूर्वी वैशालीसोबत झालेल्या भांडणात तिच्यावर कोयत्याने वार केले होते. यात ती गंभीर जखमी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी धनंजयला अटकही केली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.
सातारा शहरातील माची दगड परिसरात मंगळवारी पत्नीच्या डोक्यात पार घालून तिचा खून केला. त्यानंतर सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी घाव घेऊन पंचनामा केला. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.