Satara: कास परिसरातील डोंगरमाथ्यावर भाताची रोपे फस्त करताहेत वन्यप्राणी, शेतकरी हतबल
By दीपक शिंदे | Updated: June 19, 2024 17:51 IST2024-06-19T17:50:19+5:302024-06-19T17:51:02+5:30
गव्यांकडून भाताच्या रोपांचे नुकसान

Satara: कास परिसरातील डोंगरमाथ्यावर भाताची रोपे फस्त करताहेत वन्यप्राणी, शेतकरी हतबल
पेट्री : वादळी वारा, मुसळधार पावसाची पर्वा न करता शहराच्या पश्चिमेकडील कास परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भातशेती करतात. दरम्यान, डोंगरमाथ्यावरील भागात जंगली प्राण्यांपासून भातशेतीचे व नाचणीच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. परिसरातील शेतकरी या समस्येमुळे हतबल झाले आहेत. बहुतांशी शेतकरी नुकसान होऊ नये म्हणून शेताला कुंपण घालत आहेत.
कास परिसरातील डोंगरमाथ्यावरील भागात नाचणी व भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. उन्हाळ्यात तरव्याच्या भाजण्या करून मे व जूनमध्ये धूळवाफेला पेरणी केली जाते. यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्यात वाफसा चांगला झाला. अधूनमधून ऊन-पाऊस यामुळे रोपांची वाढ होण्यास पोषक वातावरण आहे. ओढ्यांना पुरेसे पाणी आल्यानंतर महिनाभरात मोठ्या पावसात चिखल करून भात लावणीला प्रारंभ होणार आहे. परंतु, रात्री भाताच्या, नाचणीच्या वावरात तरव्यांमध्ये केलेली रोपे खाण्यासाठी अनेक जंगली प्राणी येत आहेत.
साळिंदर, ससे, रानगवे, रानडुक्कर रात्री वावरात येऊन रोपे खात आहेत तसेच रोपे तुडवून नासधूस करत आहेत. त्यामुळे संरक्षणासाठी झडपी ठोकडा, बुजगावण्यासारख्या अनेक उपाययोजना शेतकरी करत आहेत. काहीजण रात्री रानात ओरडून जनावरांना हाकलत आहेत. काही दिवसानंतर भात लावणीला प्रारंभ झाल्यावर भाताच्या रोपांचा तुटवडा भासणार आहे. यामुळे शेती लावणीअभावी पडून राहून आर्थिक झळ बसणार आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी सोसायटीचे पीक कर्ज घेतले असल्याने पीक विम्याचे संरक्षण मिळण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
भात लावणीसाठी दोन ठिकाणी तरव्यातून भाताची रोपे तयार केली. परंतु, मंगळवारी रात्री या दोन्ही ठिकाणी रानडुकरांच्या कळपाने रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर भाताचा वाफसा खाऊन तुडवून नासधूस केली असल्याने भात लावणीसाठी रोपांची कमतरता भासणार आहे. तसेच झालेली नुकसानभरपाई मिळावी.