Satara News: आगाशिव डोंगरावर लेण्यांच्या परिसरात वणवा, चार एकरातील वनसंपदा जळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 05:10 PM2023-02-16T17:10:47+5:302023-02-16T17:11:08+5:30

प्रसंगावधानामुळे अथक प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आल्यामुळे उर्वरित डोंगर वाचला

Wildfire in the area of caves on Agashiv mountain in Satara, four acres of forest resources were burnt | Satara News: आगाशिव डोंगरावर लेण्यांच्या परिसरात वणवा, चार एकरातील वनसंपदा जळून खाक 

Satara News: आगाशिव डोंगरावर लेण्यांच्या परिसरात वणवा, चार एकरातील वनसंपदा जळून खाक 

googlenewsNext

माणिक डोंगरे

मलकापूर : आगाशिव डोंगरावरील लेण्यांच्या परिसरात अज्ञात समाजकंटकांनी भर उन्हात वणवा लावला. यात चार एकरातील वनसंपदा जळून खाक झाली आहे. उन्हामुळे वणवा वेगाने पसरू लागला. यावेळी प्रसंगावधान राखत वन अधिकाऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांनी वणवा विझवला. त्यांच्या प्रसंगावधानामुळे अथक प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आल्यामुळे उर्वरित डोंगर वाचला.

आगाशिव डोंगरावर लेण्यांच्या परिसरात अचानक वणवा लागल्याचे जवळच शेतात काम करत असलेल्या कृषिभूषण प्राध्यापक संजय थोरात यांच्या निदर्शनास आले. त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी वणवा विझविण्याचा प्रयत्न केला. पण वणवा अधिकच रौद्ररूप धारण करू लागला. त्यामुळे त्यांनी जखिणवाडी गावातील लक्ष्मण पवार व इतर सहकाऱ्यांना बोलावून घेतले. शेतीमित्र अशोकराव थोरात व त्यांचे सहकारी बाबर, सागर पवार यांच्यासह वन विभागाचे आनंद जगताप, वनपाल हनुमंत मिठारे, अमोल माने, भरत पवार, आत्माराम काळे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. 

सर्वांनी मिळून चार, साडेचार एकरात डोंगरमाथ्यावर पसरलेला वणवा प्रयत्नांची पराकाष्ठा करून विझवला. यासाठी हवेचे मशीन, झाडांच्या फांद्या आदींचा वापर करून जवळपास तीन तास अथक प्रयत्न सुरू होते. या वणव्यामध्ये डोंगर उतारावरील व कड्यातील गवत, छोटे पक्षी, सरपटणारे जीव, कीटक व प्राणी जळून खाक झाले. आगाशिव डोंगराला लागलेला हा पहिलाच वणवा आहे. 

जखिणवाडी, नांदलापूर, मुनावळे, धोंडेवाडी, विंग, चचेगाव, आगाशिवनगर, कोयना वसाहत इथल्या निसर्गप्रेमींनी फावल्या वेळेत या वनसंपदेचे रक्षण केले पाहिजे. वणवा लावणाऱ्या समाजकंटकांना प्रतिबंध होईल, अशा पद्धतीने काम केले पाहिजे. वन विभाग व त्यांचे कर्मचारी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यांना सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी यावेळी केले.

पावसाळ्यात लावलेल्या रोपांची राखरांगोळी

आगाशिव डोंगरावर पुरातन संपत्ती आहे. ती नष्ट होऊ नये म्हणून पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. पावसाळ्यात प्रयत्नपूर्वक लावलेली रोपे व बीजारोपण, बीज गोळे या माध्यमातून उगवलेल्या छोट्या रोपांची या वणव्यात राखरांगोळी झाली आहे.

वणव्यामुळेच पर्यावरणाची हानी होते. म्हणून पर्यावरणाचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. पृथ्वीवर येणाऱ्या संकटाने कोट्यवधी वन्यजीव व लोक प्रभावित होतात. अविचाराने हवा, पाणी, जंगल, जमीन यांची मानवाने हानी केल्याने हवामानात बदल होत आहेत. त्यामुळे आगाशिव येथे पायऱ्यांवरून जाणारे-येणारे पर्यटक व लेण्यांना भेट देणाऱ्यांनी वणवा लागू नये, याची काळजी घेतली पाहिजे. - तुषार नवले, वन अधिकारी कऱ्हाड

Web Title: Wildfire in the area of caves on Agashiv mountain in Satara, four acres of forest resources were burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.