कास पठारावर रानफुलांचा बहर; धबधब्यासह निसर्गसौदर्य अनुभवण्यास पर्यटकांचा साताऱ्याकडे ओढा

By दीपक शिंदे | Published: July 1, 2023 05:10 PM2023-07-01T17:10:22+5:302023-07-01T17:10:57+5:30

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावर आषाढ बाहुली अमरी, गजरा अमरी, पवेटा इंडिका, सापकांद्याचे काही तुरळक ठिकाणी दर्शन होत ...

Wildflowers bloom on the Kas Plateau; Tourists are drawn to Satara to experience the beauty of nature with waterfalls | कास पठारावर रानफुलांचा बहर; धबधब्यासह निसर्गसौदर्य अनुभवण्यास पर्यटकांचा साताऱ्याकडे ओढा

कास पठारावर रानफुलांचा बहर; धबधब्यासह निसर्गसौदर्य अनुभवण्यास पर्यटकांचा साताऱ्याकडे ओढा

googlenewsNext

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावर आषाढ बाहुली अमरी, गजरा अमरी, पवेटा इंडिका, सापकांद्याचे काही तुरळक ठिकाणी दर्शन होत आहे. कास पठार परिसरातील डोंगरमाथ्यावर काही ठिकाणी रानफुलांचा बहर अत्यंत मनमोहक दिसत आहे. बहुतांशी ठिकाणी फुललेला सातारीतुरा कास पठार परिसरातील जैवविविधतेचे भूषण म्हणून ओळखले जाते. दरम्यान, जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने धबधबे कोसळून लागले आहेत. या धबधब्यांसह कासचे निसर्गसौदर्य अनुभवयास पर्यटकांची पावले साताऱ्याकडे वळू लागली आहेत.

आषाढ बाहुली अमरी

आषाढ महिन्याच्या आसपास जांभ्या खडकात मातीच्या भागात उगवते. पाने लहान आकाराची असून जमिनीलगत असतात. त्यावर देठ असून त्यामध्ये दोन-तीन फुले येतात. पांढऱ्या रंगाच्या फुलांचा आकार सुबक बाहुलीसारखा दिसतो म्हणून बाहुली अमरी म्हणतात. शास्त्रीय भाषेत हबेनारिया ग्रँडिफ्लोरीफोरमीस नाव आहे. कास पठार, इतर सड्याच्या भागात जून महिन्यात प्रथम दर्शन देणारी पांढऱ्या फुलांची वनस्पती म्हणून ओळख आहे. अशाच प्रकारच्या याच हंगामात पाचगणांसीस हबेनारियादेखील पाहायला मिळतात.

सापकांदा

कास पठारासह आसपास डोंगरमाथ्यावर पांढरा सापकांदा( आरोशिमा मुराई) दर्शन देऊ लागला आहे. यालाच नागफणी असेही म्हणतात. शेंड्याकडील भागात दिसत असलेले झाकण पाऊस, उन्हापासूनचे संरक्षक कवच आहे. वरच्या कवचाला टोक असते. कंद परिपक्व झाल्यानंतर रानडुकरे खातात. हिरवी दांडी, तोंड पांढरे, सापासारखे वाकलेले असते,त्यामुळे पांढरा सापकांदा म्हणतात.

गजरा आमरी

झाडावरचे आर्किड आहे. मे महिन्याच्या शेवटी व जून महिन्यामध्ये पाहायला मिळतात. ग्रामीण भागात कानठिळी म्हणतात. गजरा आमरी या फुलाला एरिडस क्रिसपम या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. जाडसर, लांब पाने असतात. गुलाबी रंगांची फुले दिसतात.

वायतुरा

सातारीतुरा फूल शास्त्रीय भाषेत अपोनोजेटॉन सातारान्सिस म्हटले जाते. दुर्मीळ वनस्पतींपैकी मुळाशी कंद असणारे भुईऑर्किड आहे. पहिला पाऊस झाल्यानंतर सह्याद्रीच्या काही भागात, खडकात, मातीचा भाग त्यामध्ये पाणी साचते अशा ठिकाणी वनस्पती आढळते. जमिनीत छोटा कंद असतो. त्यावरील पान लांब, जाडसर आकाराचे असते. भाल्यासारखे दिसते. पानांमध्ये अन्नसाठा भरपूर प्रमाणात साठवत असतो. दोन-तीन पानांच्या बेचक्यातून लांब, जाडसर अशा दांड्यात इंग्रजी वाय आकाराचा तुरा येतो, म्हणून यास वायतुरा म्हणतात. हे फूल केवळ साताऱ्याच्या पश्चिम भागात चार-पाच ठिकाणीच सड्यावर आढळते.

भुईचक्र

इपिजिनिया इंडिका शास्त्रीय नाव आहे. लसूण, कांद्यासारख्या बारीक पाती असतात. खाली कंद असतो. दहा-बारा दिवसांनंतर एकच बोंड अथवा गाठ तयार होते. त्यात मोहरीसारखे चार-पाच दाणे असतात. बोंड फुटून हे दाणे एक मीटर अंतरावर पडतात. निळसर, लाल रंगाचे फूल दिसते.

जून ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान तृण, कंद, वेली, तसेच वृक्ष, झुडपे, आर्किड व डबक्यातील वनस्पतींना अत्यंत आकर्षक निळ्या, जांभळ्या, लाल, रंगाची फुले येतात. मध्य ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात विविधरंगी दुर्मीळ फुलाचे गालिचे आकर्षित करतात. - अभिजित माने, परिवीक्षाधीन वनक्षेत्रपाल, मेढा

Web Title: Wildflowers bloom on the Kas Plateau; Tourists are drawn to Satara to experience the beauty of nature with waterfalls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.