वणव्यामुळे वन्यजीवांचा अधिवास धोक्यात, तर वनसंपदेचे अतोनात नुकसान...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:40 AM2021-04-02T04:40:53+5:302021-04-02T04:40:53+5:30

वरकुटे-मलवडी : उन्हाळा तीव्र होत असून, मार्च महिन्यातील वाढत्या तापमानामुळे पारा चाळीस अंशाकडे झुकला आहे. त्यातच यंदाच्या वर्षीच माण ...

Wildlife habitat endangered due to deforestation, while severe damage to forest resources ...! | वणव्यामुळे वन्यजीवांचा अधिवास धोक्यात, तर वनसंपदेचे अतोनात नुकसान...!

वणव्यामुळे वन्यजीवांचा अधिवास धोक्यात, तर वनसंपदेचे अतोनात नुकसान...!

Next

वरकुटे-मलवडी : उन्हाळा तीव्र होत असून, मार्च महिन्यातील वाढत्या तापमानामुळे पारा चाळीस अंशाकडे झुकला आहे. त्यातच यंदाच्या वर्षीच माण तालुक्यातील डोंगर-टेकड्या व पठारावर वणवे लागण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे वनसंपदा व वन्यप्राण्यांचे देखील होरपळून मोठे नुकसान होत आहे. माण तालुक्यातील डोंगर-टेकड्या काळवंडल्या आहेत. काही ठिकाणी अज्ञानातून, तर काही ठिकाणी मुद्दाम वणवे लावले जात आहेत. पर्यावरणाच्यादृष्टीने वणवे रोखण्यासाठी वन विभागाने कडक पावले उचलणे गरजेचे आहे.

यंदा वरकुटे-मलवडी, पळसावडे, देवापूर, शिरताव, वरकुटे-म्हसवड, थदाळे, हस्तनपूर, शिंगणापूर आदी डोंगर-टेकड्यांवर वणव्यांचे प्रकार घडले आहेत. येथील लागलेल्या वणव्यांमुळे डोंगर-टेकड्या, पठारे ही उघडी बोडकी झाली आहेत. शेळ्या-मेंढ्यांसह जनावरांना वाळका चारासुद्धा शिल्लक राहिला नाही. दोन वर्षापासून समाधानकारक पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. यामध्ये मुख्यतः पांढऱ्या आणि काळ्या कुसळांच्या गवताचे प्रमाण अधिक आहे. ते अधिक ज्वलनशील असल्याने ठिणगीच्या संपर्कात आले, तर ताबडतोब पेट घेते. बघता-बघता आग वाऱ्याच्या गतीने पसरून होत्याचे नव्हते होते.

माण तालुक्यातील काही भागात जाणून-बुजून वणवे लावले जात असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून केल्या जात आहेत. वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे अमूल्य वनसंपदा त्याचबरोबर औषधी वनस्पतींचे नुकसान होत आहे. मोठे वृक्षही होरपळून जात आहेत. वन विभागाने आणि सामाजिक संस्थांनी तसेच शासनाने केलेल्या वृक्ष लागवडीचेही वणव्यामुळे नुकसान होत आहे. वृक्ष लागवड अभियानातील चांगली वाढलेली झाडे वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. वणव्यांमुळे वन्यजीवांचा अधिवास धोक्यात येत आहे. अनेक छोटे-मोठे वन्यजीव आगीत सापडून होरपळले जात असल्याने. जीवसृष्टीच्या चक्रातून गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे कित्येक वन्यजीव गावाकडे धाव घेत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे.

चौकट :

अनेकवेळा हे वणवे मुद्दाम लावले जात आहेत.

डोंगर-टेकड्यांवरील वणवा रात्रीच्या वेळी खूप छान दिसतो, म्हणून फोटो काढण्यासाठी वणवे लावणारे बहाद्दरही आहेत. पुढीलवर्षी पावसाळ्यात चांगले गवत यायचे असेल, तर आताचे जाळावे लागते, असा गैरसमज पसरल्यानेही वणवे लावले जात आहेत. सिगारेटच्या अर्धवट जळालेल्या थोटक्यानेही मोठे वणवे लागत आहेत. अजाणतेपणी किंवा मुद्दाम लावलेल्या वणव्यांनी वन्यजीवसृष्टीचे मात्र मोठे नुकसान होत आहे.

कोट :

सातत्याने लागणाऱ्या या वणव्यांवर वन विभागाने नियंत्रण आणणे गरजेचे आहे. यासाठी माण तालुक्याच्या प्रत्येक गावातून जनजागृती व्हायला हवी. वेगवेगळ्या समित्या स्थापन करून, त्यांंच्या माध्यमातून वणवे रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत, तरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडणारी वनसंपदा वाचण्यास मदत होईल. अन्यथा, पर्यावरणाचे नुकसान असेच होत राहील

- धीरज जगताप

पर्यावरणप्रेमी, वरकुटे-मलवडी

०१वरकुटे-मलवडी

माण तालुक्यातील डोंगरावरही वणवे लावण्याचे प्रमाण वाढले आहे. काही वनमित्र वणवा विझविण्याचा प्रयत्न करतात. (छाया : सिध्दार्थ सरतापे)

Web Title: Wildlife habitat endangered due to deforestation, while severe damage to forest resources ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.