वन्यहद्दीत प्राण्यांची राजरोस शिकार

By admin | Published: February 10, 2015 09:42 PM2015-02-10T21:42:46+5:302015-02-10T23:56:52+5:30

अन्नसाखळी धोक्यात : कोळेनजीक जंगलात शिकाऱ्यांचा वावर वाढला, हिंस्त्र श्वापदांचा मोर्चा लोकवस्तीकडे

Wildlife hunt | वन्यहद्दीत प्राण्यांची राजरोस शिकार

वन्यहद्दीत प्राण्यांची राजरोस शिकार

Next

कुसूर : वनविभागाच्या कोळे येथील क्षेत्रात शिकाऱ्यांचा वावर वाढला आहे. रानडुक्कर, मोर, ससे, साळींदर आदि वन्यप्राण्यांची शिकार होत आहे. या शिकारीमुळे बिबट्यांसारख्या हिंस्त्र श्वापदांच्या भक्ष्यांमध्ये कमालीची घट झाली आहे. परिणामी बिबट्यांचा वावर वस्त्या आणि गावांमधूनही होऊ लागल्याच्या घटना घडत आहेत.
तारूख, बामणवाडी, वानरवाडीसह कोळे क्षेत्रातील अन्य काही क्षेत्रात मोठया प्रमाणात वृक्ष लागवड आहे. वन्यप्राण्यांना पोषक वातावरण असल्यामुळे प्राण्यांची संख्या जास्त आहे. मात्र या प्राण्यांची शिकार होत आहे. बाहेरून आलेले शिकारी या परिसरात शिकारीसाठी फिरताना दिसत आहेत.
मोर, ससे, रानडुक्कर, साळींदर या प्राण्यांची शिकार केली जात आहे. या घटनांमुळे नैसर्गिक साखळी तुटली जात असून त्यामुळे वन्य प्राण्यांचा वावर लोकवस्तीपर्यंत होऊ लागला आहे. साखळीमधील बहुतांश प्राण्यांची संख्या कमालीची कमी झाली आहे.
शिकाऱ्यांचा उपद्रप, डोंगरात लागणारे वणवे आणि सरपणासाठी होणाऱ्या वृक्षतोडीमुळे वन्यप्राण्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. हिंस्त्र प्राण्यांना साखळीमधील सावज मिळत नसल्यामुळे या प्राण्यांनी लोकवस्ती मधील पाळीव प्राण्यांना लक्ष्य केले आहे.
बिबट्यांकडून होणाऱ्या हल्यांमुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. उजाड पडलेल्या डोंगरांमुळे बिबट्याने थेट शिवारातील ऊसाच्या शेतात आपला तळ ठोकला आहे. वन्यप्राण्यांना त्रास देत असलेल्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)


जाळीसह बंदुकीचाही वापर
शिकारी शिकार करण्यासाठी येताना आवश्यक असणारे साहित्य सोबतच घेऊन येत आहेत. शिकार करण्यासाठी त्यांच्याकडून जाळी, भाला, बंदूक आणि इलेक्ट्रीक करंटचा वापर केला जात आहे. मात्र, वनखात्यांकडून कधीही त्यांची तपासणी केली जात नाही

वीजप्रवाहाचा प्रयोग जीवघेणा
रानडुक्करांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने काही शेतकऱ्यांकडून शेताकडेने तार फिरवली जाते. त्या तारेमध्ये वीज प्रवाह सोडला जातो. रानडुक्कर पिकामध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत असताना वीजेचा धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू होतो. हा प्रकार भयानक असून अशा प्रकारामुळे एखाद्या व्यक्तीचा जिव जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

नुकसान लाखांत, भरपाई हजारांत
बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव जनावरे मारली गेल्यास वनविभागाकडून नुकसान भरपाई दिली जाते. मात्र, ही भरपाई अतीशय तोकडी असते. एखाद्या शेतकऱ्याचे लाख रूपयाचे नुकसान झाले असेल तर त्याला मिळणारी भरपाई काही हजारातच असते. या तुटपुंज्या भरपाईमुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरून येत नाही.

Web Title: Wildlife hunt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.