सातारा: ढेबेवाडी विभागात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ, पिकांचे नुकसान; शेतकरी त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 06:11 PM2022-11-16T18:11:39+5:302022-11-16T18:12:15+5:30
वनविभागाला जाग कधी येणार, अशी शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया
कऱ्हाड : ढेबेवाडी विभागात रानडुकरांनी व गव्यांनी धुमाकूळ घातला आहे. ऊस पिकासह भुईमूग, भात पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. तरीही वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीकडे दुर्लक्ष करीत आहेत.
ढेबेवाडी विभाग डोंगरी व जंगलाने व्यापलेला आहे. गत आठ-दहा वर्षांत येथे जंगल मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी रानडुकरांसह गव्यांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. रानडुकरांनी काळगाव, उमरकांचन, सणबूर, सळवे परिसरात उच्छाद माजविला आहे. जानुगडेवाडी, बनपुरी, सळवे व बाचोली याठिकाणी रानडुकरांनी नुकसान केले आहे. रानडुकरांचे कळप रात्री शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त करीत आहेत.
तर निवी, कसणी, वरचे घोटील, कारळे, सातर, तामिणे व पानेरी या गावांना जंगल लागूनच असल्याने रानडुकरांबरोबरच, गवे पीक उद्ध्वस्त करीत आहेत. मात्र, वनविभागाचे कर्मचारी सुस्त आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास टाळाटाळ करून आपली जबाबदारी झटकत आहेत. वनविभागाला जाग कधी येणार, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
नुकसानग्रस्तांना भरपाई मिळेना
वनविभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यापेक्षा टाळाटाळ करण्यात धन्यता मानत आहेत. पंचनामे करून आपला फायदा नाही, अशी मानसिकता या वन कर्मचाऱ्यांची झाली आहे. परिणामी, शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहत आहेत.