मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही- उदयनराजे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 12:10 PM2019-10-01T12:10:06+5:302019-10-01T12:10:35+5:30
सातारा पोटनिवडणुकीसाठी उदयनराजेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला आहे.
साताराः सातारा पोटनिवडणुकीसाठी उदयनराजेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी तत्कालीन आघाडी सरकारवर टीका केलीय. ते म्हणाले, दर पाच वर्षांनंतर लोकशाहीची प्रक्रिया राबवली जाते. केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्यातील निवडणुका अटळ असतात. माझ्या मनावर एक प्रकारचं दडपण होतं, ते आता नाहीसं झालंय. मोकळ्या मनानं लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याकरता सज्ज झालो आहे.
आदरणीय पवार साहेब सगळ्यांनाच मंत्रिपदं देऊ शकत नाही, तरीही मला कुठल्याही पदाची अपेक्षा नव्हती, माझ्या मतदारसंघात अनेक वर्षांपासून रखडलेली कामं मार्गी लावणार आहे. 1996पासून कृष्णा खोरेची मूलभूत कामं मार्गी लागलेली नाहीत. त्यावेळीसुद्धा मी मुंडेसाहेबांना दुष्काळी भागाला न्याय मिळण्याची मागणी केली होती. अटलजींनी नदीजोड प्रकल्पाची संकल्पना मांडली होती, परंतु ती काही आघाडी सरकारनं पूर्ण केलेली नाही. राजकारण करणं हा माझा पिंड नाही. लोकांचे प्रश्न घेऊन मी पुढे जात असतो, असंही उदयनराजे म्हणाले आहेत.
दुसरीकडे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील विरुद्ध माजी खासदार उदयनराजे भोसले असा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने श्रीनिवास पाटील 3 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीतर्फे उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू होत्या.
परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातून विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतल्याने मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील यांच्या नावाची घोषणा केली.शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना मंगळवारी फोन करून श्रीनिवास पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करा अशी सूचना केली आहे. 3 ऑक्टोबर रोजी पाटील उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राष्ट्रवादीचे विधानसभेसाठी इच्छुक असलेले सगळे उमेदवार यावेळी उपस्थित राहणार आहेत.