हमीभावाने सोयाबीन खरेदीचा निर्णय, फायदा होणार ?; शेतकऱ्यांमध्ये साशंकता
By नितीन काळेल | Published: September 9, 2024 06:48 PM2024-09-09T18:48:12+5:302024-09-09T18:48:37+5:30
तर क्विंटलला ३०० रुपये तरी जादा मिळणार
सातारा : सोयाबीनला कमी दर मिळत असल्याने केंद्र शासनाने राज्यात हमीभावाने खरेदीला मान्यता दिली आहे. यामुळे सध्याच्या दरानुसार ३०० रुपये तरी क्विंटलला जादा मिळतील. याचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल. परंतु, मागील अनुभव पाहता नियमामुळे आणि सक्षम यंत्रणा नसल्याने शेतकऱ्यांचा खरंच फायदा होणार का? याबाबत साशंकता आहे.
राज्यात मागील काही वर्षांत सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यात तर यावर्षी ९६ हजार हेक्टरवर सोयाबीन आहे. पण वर्षभरात क्विंटलचा दर साडेचार हजार रुपयांदरम्यानच राहिला. यामुळे शेतकऱ्यांवर घरात सोयाबीन ठेवण्याची वेळ आली. सध्या खरिपातील सोयाबीन काढणीची वेळ आली तरी हमीभावाएवढाही दर मिळत नाही. त्यामुळे केंद्र शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी मान्यता दिली आहे.
सोयाबीन उत्पादकांना मदत व्हावी आणि बाजारभाव पडल्याने नुकसान होऊ नये, यासाठी खरेदी केंद्रे सुरू होणार आहे. पण याचा फायदा शेतकऱ्यांना होणार का? याविषयी साशंकता आहे. अशा केंद्रांमुळे निराशा होत आहे. शासकीय यंत्रणा कमकुवत ठरत आहे. केंद्रावर सोयाबीन नेल्यास दर्जा नाही, घाण-माती आहे, ग्रेडमध्ये बसत नाही, अशी कारणे सांगून हमीभावही टाळला जातो, असे शेतकरी सांगतात.
- जिल्ह्यात सोयाबीन क्षेत्र - ९६ हजार हेक्टर
- सध्या मिळणारा क्विंटलचा दर - सरासरी ४५०० ते ४६००
- हमीभाव - ४८९२
केंद्र शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदीचा निर्णय घेतला तरी केंद्रांवर व्यापारीधार्जिणे धोरण असते. नियम आणि विविध कारणे सांगून दर मिळत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन कोठेही विकले आणि पक्की पावती आणली तर हमीभावाएवढा दर मिळण्यासाठी वरील फरकाची रक्कम द्यावी. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना