सातारा अन् माढ्याचा खासदार भाजपचाच - जयकुमार गोरे
By नितीन काळेल | Published: February 22, 2024 05:36 PM2024-02-22T17:36:05+5:302024-02-22T17:38:03+5:30
सातारा : माण-खटाव तालुक्यात पाच वर्षांत दुष्काळ न ठेवण्याचा संकल्प असून २५ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माणमध्ये जलपूजनाला ...
सातारा : माण-खटाव तालुक्यात पाच वर्षांत दुष्काळ न ठेवण्याचा संकल्प असून २५ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माणमध्ये जलपूजनाला येणार आहेत, अशी माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी दिली. त्याचबरोबर सातारा आणि माढ्याचा खासदार भाजपचाच होणार असल्याचा दावा करत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी त्यांची भूमिका मांडली. आता मीही फलटणमध्ये जाऊन भूमिका मांडणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार गोरे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण गोरे उपस्थित होते. आमदार जयकुमार गोरे हे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण हे सातारा दाैऱ्यावर येणार असल्याच्या पार्श्वभूमिवर आयोजित बैठकीस आल्यानंतर त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली.
आमदार गोरे म्हणाले, माण-खटाव तालुक्यातील दुष्काळ हटाव मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू आहे. यातील जिहे-कठापूर सिंचन योजनेचा पहिला टप्पा पूर्णत्वास जात आहे. या योजनेच्या आंधळी धरणातील पाण्याचे पूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे, अशी भावना होती. सर्व तयारीही करण्यात आलेली. पण, पंतप्रधान मोदी यांना येणे शक्य झाले नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २५ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता जलपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. हा एेक एेतिहासिक क्षण असणार आहे.
आतापर्यंत माण आणि खटाव तालुक्यातील दुष्काळ हटविण्याचेच काम केले आहे. उरमोडी योजनेचे पाणी ९७ गावांत तर तारळीचे पाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचले आहे. तसेच माण-खटाव तालुक्यातील ४२ गावांसाठी टेंभूचा सहावा टप्पा मंजूर केला. शासनाने मंजुरी दिली आहे. तसेच यासाठी अडीच टीएमसी पाणी मिळाले आहे. आॅगस्ट महिन्यात टेंभू योजनेचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. त्याचबरोबर आैंध परिसरातील पाणीप्रश्नही सोडविणार आहे, असेही आमदार गोरे यांनी सांगितले.
दरम्यान, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी माढा मतदारसंघात तयारी केल्याचे व त्यांनी आपल्यावर टीका केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर आमदार गोरे यांनी ते ज्या भाषेत बोलले, त्यांच्या उंचीला शोभते का हे त्यांनाच माहीत. आता त्यांनी भूमिका मांडली आहे. मी माझी भूमिका फलटणमध्ये जाऊन मांडणार आहे, असा एकप्रकारे इशाराच दिला आहे.
तरीही रणजितसिंह खासदार झाले..
माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे खासदार होऊ नयेत म्हणून त्यांनी प्रयत्न केले होते. त्यावेळी ते आमच्याबरोबर नव्हते. तरीही रणजितसिंह नाईक-निंबाळकर खासदार झाले, असे प्रत्युत्तर आमदार जयकुमार गोरे यांनी रामराजेंना दिले. त्याचबरोबर आताही माढ्याचा खासदार हा भाजपचाच होणार असल्याचेही स्पष्ट केले. तर सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघ निवडणूक लढविण्यास भाजप सक्षम असल्याचा दावाही आमदार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.