छोडेंगे ‘हात’ मगर तेरा साथ ना छोडेंगे !
By admin | Published: March 15, 2017 10:52 PM2017-03-15T22:52:38+5:302017-03-15T22:52:38+5:30
कऱ्हाडला दोन पाटलांचा पुन्हा ‘दोस्ताना’ : दक्षिण-उत्तरच्या नव्या समीकरणांची नांदी; उंडाळकर-बाळासाहेब ‘सात-सात’
कऱ्हाड : कऱ्हाड पंचायत समिती निवडीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण-उत्तरच्या पाटलांचा पुन्हा एकदा ‘दोस्ताना’ पाहायला मिळाला. वडिलांपासून सुरू असणाऱ्या दोस्तीत काही गोष्टींमुळे अंतर पडले होते खरे; पण नव्या पिढीनेही आता ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे... छोडेंगे हात मगर तेरा साथ ना छोडेंगे’ हे गाणं गायला सुरुवात केल्याने कऱ्हाड दक्षिण-उत्तरची राजकीय समीकरणे बदलू लागली तर कोणाला आश्चर्य वाटायला नको.
जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका म्हणून कऱ्हाडची ओळख आहे. चोवीस पंचायत समिती सदस्य संख्या असल्याने येथील पंचायत समितीच्या सभापतीला नेहमीच महत्त्व राहिले आहे. तालुक्यात दक्षिण व उत्तर असे विधानसभेचे दोन मतदारसंघ असल्याने या दोन्ही मतदार संघाचा पंचायत समितीशी संबंध येतो; पण गेली अनेक वर्षे दोन्ही आमदारांनी वर्चस्वाचा वाद न घालता ‘दोस्ताना’ करीतच सभापती एकाला उपसभापती दुसऱ्याला अशी भूमिका कायम ठेवली.
दिवंगत पी. डी. पाटील व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यापासून हा ‘दोस्ताना’ चालत आला आहे. पंचायत समितीसह तालुक्यातील सर्व संस्थांच्या निवडणुकीत परस्परांना मदत करीत सत्तेचा समतोल राखण्याचे काम आजवर होताना दिसते.
मात्र, सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी कऱ्हाड बाजार समितीच्या निवडणुकीत तत्कालीन दोन आमदारांच्यात अंतर पडले. राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याच्या राजकारणात एक महाआघाडी उदयास आली. आणि बाजार समितीत ऐतिहासिक सत्तांतर झाले. त्यात मदनराव मोहिते, आनंदराव पाटील, डॉ. अतुल भोसले यांच्यासह दिवंगत महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांचे मोलाचे योगदान होते, हे विसरता येणार नाही.
त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अतुल भोसलेंनी उत्तरेवर स्वारी करण्याचा निर्णय घेतला. आणि या महाआघाडीत बिघाडी झाली. त्यात आजपर्यंत दुरुस्ती झालेली पाहायला मिळालेली नाही. त्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील राजकीय समीकरणे प्रत्येक निवडणुकीत बदलताना बघायला मिळतात. गत विधानसभा निवडणुकीत उंडाळकरांच्या पराभवाला बाळासाहेबांचा हातभार लागला, हे नाकारता येणार नाही; पण पराभवानंतर उंडाळकरांनी भोसलेंशी मैत्रिपर्व करीत त्याचा वचपा बाजार समितीत काढला, हे नक्की.
भोसलेंनीही उंडाळकरांच्या मदतीने कृष्णेचा गडही सर केला. आता हे मैत्रिपर्व कडेला जाईल, असे काहींना वाटत असतानाच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत हे मैत्रिपर्व संपले. आणि तुटलेले मोहिते-भोसलेंचे मनोमिलन पुन्हा जुळले. दक्षिणेत तिरंगी लढत होत असतानाच उत्तरेत मात्र राष्ट्रवादीच्या बाळासाहेबांना काँग्रेस आणि भाजपबरोबर उंडाळकरांच्या विकास आघाडीनेही घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाळासाहेबांनी सात जागा जिंकल्या. दक्षिणेतही उंडाळकरांच्या आघाडीने सात जागा जिंकल्या. भाजपला सहा जागांवरच समाधान मानावे लागले. तर काँग्रेसच्या हाताला फक्त चारच जागा लागल्या. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता.
या निवडणुकीत परस्परांच्या विरोधात लढताना आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. प्रसंगी एकमेकांचे वस्त्रहरणही केले होते. शब्दांच्या अस्त्रांनी केलेले वार आणि त्यामुळे झालेल्या जखमा ताज्या असताना त्यावर मलमपट्टीचे प्रयत्न राजकारणातील काही डॉक्टरांनी सुरू केले. पण जखमा बऱ्या व्हायला तयार नव्हत्या. कोणी वकिलीचा कोट बाजूला काढून ठेवत माणुसकीच्या नात्याने चर्चा चालविल्या; पण सर्व परिस्थिती संभ्रमाचीच होती. कोणीच काही खात्रीशीर सांगत नव्हते. उलटसुलट चर्चांना वेग आला होता. मात्र, मंगळवारी सकाळी सभापती निवडीसाठी दोन पाटलांचा ‘दोस्ताना’ अनेकांनी पाहिला. आणि कार्यकर्त्यांना मिळायचे ते संकेत मिळाले.
राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो. हे वारंवार दिसून येते. त्याचेच प्रत्यंतर या निमित्ताने पाहायला मिळाले आहे. त्यामुळे या दोघांनी हातात हात घालून भविष्यातील राजकारण केल्यास तालुक्यातील भविष्यातील समीकरणे बदललेली असतील, हे मात्र नक्की. (प्रतिनिधी)