भविष्यात पाणीप्रश्नावर लक्ष देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:42 AM2021-08-23T04:42:21+5:302021-08-23T04:42:21+5:30
वाठार स्टेशन : ‘विकासकामे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. एक काम झाले की दुसरे काम उभे राहणार, याकरिता गावच्या ...
वाठार स्टेशन : ‘विकासकामे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. एक काम झाले की दुसरे काम उभे राहणार, याकरिता गावच्या विधायक विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक गावाला पाणी मिळेल, त्यामुळे भविष्यात या विषयावर मी लक्ष देणार आहे,’ असे मत आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केले.
बिचुकले (ता. कोरेगाव) येथे सांस्कृतिक भवन आणि हनुमान मंदिर जीर्णोद्धार कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बर्गे, शिवसेना वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष संभाजीराव जगताप, माजी पंचायत समिती सदस्य विलास पवार, देऊरचे सरपंच शामराव कदम, तडवळेचे सरपंच नाना बडेकर, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष जाधव, नीलेश नलवडे, धनाजी मोहिते, बाबूराव पवार, महेश साबळे कदम, कमलाकर भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले, ‘समाजकारण व राजकारण करताना प्रत्येक गावाच्या विकासाची वाटचाल करण्याची भूमिका लोकप्रतिनिधीची असली पाहिजे, त्या कामी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीला हाताला काम मिळाले पाहिजे, त्याचे आर्थिक जीवनमान उंचावले तरच तो समाजासाठी योगदान देऊ शकेल. आगामी काळात मतदारसंघातील गावागावांत असलेले पाणंद रस्ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. बिचुकले गावातील १३ किलोमीटरचा पाणंद रस्ता कृषी क्षेत्राला प्राधान्य देऊन पशुसंवर्धनासाठी बळकटी दिली जाईल. यामध्ये शेळीपालन, फळबाग लागवड, गाई फार्म, मत्स्य व्यवसाय अशा शेतीशी निगडित व्यवसायाला चालना देण्याचे काम आगामी कालावधीत केले जाईल.’
सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी उद्योजक अमर पवार यांनी स्वतःची जागा मोफत दान केली.
२२बिचुकले
फोटो ओळ : बिचुकले (ता. कोरेगाव) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार महेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.