सेवाज्येष्ठतेचे उल्लंघन होऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:39 AM2021-07-31T04:39:12+5:302021-07-31T04:39:12+5:30
सातारा : सेवाज्येष्ठता यादीमध्ये झालेल्या त्रुटी दूर करण्यासाठी शिक्षण मंडळाची तातडीची बैठक आयोजित केली जाईल. तसेच पात्र शिक्षकांची सेवाज्येष्ठता ...
सातारा : सेवाज्येष्ठता यादीमध्ये झालेल्या त्रुटी दूर करण्यासाठी शिक्षण मंडळाची तातडीची बैठक आयोजित केली जाईल. तसेच पात्र शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादीनुसार मुख्याध्यापकपदी नेमणूक केली जाईल, अशी ग्वाही उपनगराध्यक्ष तथा शिक्षण सभापती मनोज शेंडे यांनी दिली.
सेवाज्येष्ठ शिक्षकांची मुख्याध्यापकपदी नेमणूक करणे अपेक्षित असताना सातारा पालिकेच्या काही शाळांमध्ये या नियमाचे उल्लंघन करण्यात आले आहे. १५ पैकी पाच शाळांच्या मुख्याध्यापकपदी कनिष्ठ शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. या प्रकाराबाबत गुरुवारी (दि. २९) ज्ञानेश्वर कांबळे, नंदकिशोर वाघमारे, तानाजी मस्के, अजित बल्लाळ, शैला कांबळे, संगीता आखाडे या शिक्षकांनी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपल्या समस्या मांडल्या.
शाळांचे प्रशासकीय कामकाज चालविण्यासाठी सर्वसाधारण सेवाज्येष्ठता यादी तयार करून सेवाज्येष्ठ शिक्षकांची मुख्याध्यापकपदी नेमणूक करावी, असा शासन निर्णय आहे. शिक्षण मंडळाने तयार केलेल्या सेवाज्येष्ठता यादीनुसारच ज्या त्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षकांवर ही जबाबदारी सोपविणे क्रमप्राप्त आहे. मात्र पालिकेच्या पाच शाळांमध्ये शासकीय नियमांचे उल्लंघन करून कनिष्ठ शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. नियमबाह्य करण्यात आलेल्या निवडी रद्द करून वरिष्ठ व पात्र शिक्षकांची मुख्याध्यापकपदी नेमणूक करावी, अशी मागणी शिक्षकांनी केली.
‘शिक्षकांच्या नेमणुका नेमक्या कोणत्या पद्धतीने झाल्या, सेवाज्येष्ठता नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे किंवा नाही याबाबत शिक्षण मंडळाची तातडीने बैठक घेतली जाईल. या बैठकीत योग्य तो निर्णय घेऊन पात्र शिक्षकांच्या नेमणुका केल्या जातील. कोणत्याही शिक्षकावर अन्याय होऊ देणार नाही,’ अशी ग्वाही उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली.
(चौकट)
... तर उपोषणाला बसणार
आपल्या मागण्यांबाबत शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. झालेल्या चुकादेखील त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. आमच्यावरील अन्याय दूर न झाल्यास दि. ९ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणास बसणार असल्याचा इशारा नगरपालिका शाळा क्रमांक २ चे उपशिक्षक ज्ञानेश्वर कांबळे यांनी दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी व उपनगराध्यक्षांना निवेदनही देण्यात आले आहे.