दुष्काळग्रस्तांच्या अश्रंमध्ये रंग भिजविणार नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2016 11:22 PM2016-03-27T23:22:46+5:302016-03-28T00:21:37+5:30
आज रंगपंचमी : सोडलेल्या संकल्पाला अन् घेतलेल्या शपथेला जागणार जिल्ह्यातील नागरिक
सातारा : आज रंगपंचमी. हा सण आयुष्य रंगतदार कसं करायचं शिकवितो. पण दुष्काळाचा दाह वाढतोय. पाणीटंचाईचं मोठं संकट उभं ठाकलंय सर्वांसमोरच. माणसांसह जनावरं घोटभर पाण्यासाठी तहानलीत. एकीकडं असं विदारक ‘जीवन’ असताना दुष्काळग्रस्तांच्या अश्रंूमध्ये रंग भिजविणार नाही, असा निर्धार जणू गावोगावच्या तरुणाईनं, विद्यार्थ्यांनी केलाय. म्हणूनच कोरडे रंग लावून रंगपंचमीचा आनंद लुटायला तरुणाई सज्ज झालीय. पाण्याची नासाडी न करता रंग खेळून आनंद लुटण्यातच या सणाचं खरं साजरेपण आहे. यातूनच वाचलेल्या थेंबा थेंबानं कोरडे घसे ओलावतील अन् खऱ्या अर्थानं हा सण सर्वांसाठीच रंगतदार ठरणार आहे. गेल्या चार दिवसांपासून ‘लोकमत इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून सुरू केलेल्या ‘रंग उधळू या... पाणी सांभाळू या’ या उपक्रमाला जिल्हाभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला. गावोगावच्या ग्रामसभांमधून, शाळांमधून पाणीबचतीचा संकल्प सोडला गेला. एवढेच काय पण विविध संस्था, तरुण मंडळांच्या तरुण कार्यकर्त्यांनीही कोरडी रंगपंचमी खेळून पाणी वाचविण्याची शपथ घेतली. वाया जाणाऱ्या पाण्याच्या एका थेंबाचंही महत्त्व आता सर्वांना उमजलंय. आता वेळ आहे ती हे सर्व कृतीतून दाखविण्याची. रंगपंचमी म्हटलं की रंगांची उधळण अन् पाण्याची बरसात; पण पाण्याशिवायही रंगपंचमीचा आनंद लुटता येऊ शकतो, हे दाखविण्यासाठी आता जिल्ह्यातली गावंच्या गावं सज्ज झालीत. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात ‘ड्राय रंगपंचमी’ची गरज आणि महत्त्व ‘लोकमत’नं पोहोचवलंय. वाचविलेल्या पाण्यानं एखाद्या मुक्या जीवाची तहान भागविता आली तरी रंगपंचमीचा हा सण खऱ्या अर्थानं सार्थकी लागणार आहे. (प्रतिनिधी) संवेदनशीलता जागृत करणारा सण मानवी जीवनांत जर प्रेम नसेल, आस्था, जिव्हाळा नसेल तर जगणंही रंगतदार होत नाही अन् पाणी नसेल तर जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. उद्याचा रंगपंचमीचा सण आपल्याला बरचं काही सांगून अन् शिकवून जाणारा ठरणार आहे. विशेष म्हणजे तहानलेनं व्याकुळ झालेल्या जिवाची तहान भागविण्याची जाणीव करून देणारा आहे. पाणी म्हणजे जीवन, ते उधळून न देता त्याचा सदुपयोग झाला तर यंदाची रंगपंचमी सर्वांसाठीच संस्मरणीय ठरेल.