‘विमान’ उडणार की ‘कपबशी’ खणखणणार ?

By admin | Published: March 10, 2015 10:31 PM2015-03-10T22:31:50+5:302015-03-11T00:12:08+5:30

‘सह्याद्री’चे चिन्ह वाटप : अपक्षांच्या हातात ‘ढाल तलवार’ अन् ‘शिट्टी’ --सह्याद्रीचा रणसंग्राम

Will the 'plane' fly or climb the 'cup'? | ‘विमान’ उडणार की ‘कपबशी’ खणखणणार ?

‘विमान’ उडणार की ‘कपबशी’ खणखणणार ?

Next

कऱ्हाड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा हातात ‘कपबशी’ घेतलीय, तर एकवटलेल्या विरोधकांनी ‘विमाना’च्या वेगाने प्रचाराचा धूमधडाका सुरू केलाय. १७ मार्चला होणाऱ्या निवडणूक निकालात विरोधकांचे ‘विमान’ उडणार की, शेतकरी सभासद सत्ताधाऱ्यांच्या हातचाच चहा ‘कपबशी’तून पिणे पसंत करणार, हे येणारा काळच सांगेल. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष सध्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत; पण मागील विधानसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी पक्षाने डावलल्याने त्यांनी अपक्ष म्हणून ‘कपबशी’ हातात घेतली होती. सभासद शेतकऱ्यांच्या घरात चिन्ह पोहोचवणे सोपे व्हावे, यासाठीच त्यांनी हे चिन्ह मागितले होते. अपेक्षेप्रमाणे ते त्यांना मिळालेही. प्रस्थापितांविरोधात विधानसभेत दंड थोपटणाऱ्या ‘धैर्यशीलां’नी या निवडणुकीत एक ‘कदम’ मागे घेत, ‘घोरपडें’नाही बरोबर घेतलंय. मग काय या दोघांचं जमलंय म्हटल्यावर माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर समर्थकांनीही मदतीचा ‘हात’ पुढे केलाय. या हातात ‘कमळा’चं फूल अन् सेनेचा ‘धनुष्यबाण’ही आपसूक आलाय. एवढं सगळं जुळून आल्यावर आपण विजयाची ‘विमान’भरारी मारू असंच त्यांना वाटू लागलंय.खरंतर विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक मारणाऱ्या बाळासाहेबांच्या ‘कपबशी’तील चहात ‘सह्याद्री’च्या निवडणुकीत साखरेऐवजी मिठाचा खडा पडू पाहतोय. दोन रुपये किलो दराने साखर कधी मिळणार ? ऊसतोडणी प्रोग्रॅमला शिस्त कधी लागणार ? उसाला ‘एफआरपी’ प्रमाणे दर कधी मिळणार? आदी प्रश्न ‘कपबशी’तून चहा पिता-पिताच सभासदांना पडू लागलेत. अन् त्याची उत्तरे देताना उमेदवारांनाही पाहूणचारासाठी दिलेला ‘कपबशी’तील चहा गोड लागेनासा झालाय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची प्रचारात गोची होणार म्हणे ! घाटमाथ्यावरचं वातावरणही आता तापू लागलंय. त्यामुळे येथील सभासद कपबशीतील चहा पिणार की, विमानाच्या ‘टेकआॅफ’ला मदत करणार, हे ही कळेनासं झालंय. दहा विद्यमान संचालकांच्या उमेदवारीला कात्री लावल्याने तसेच अनेक इच्छुकांना उमेदवारी न देता आल्याने, नाराजांना ‘कसेबसे’ सावरण्याची कसरत सत्ताधाऱ्यांना करावी लागणार, असे दिसते. आता आगामी काळात विद्यमान संचालक आणि इच्छुक कार्यकर्ते काय भूमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Will the 'plane' fly or climb the 'cup'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.