ोरेंना त्यांची जागा दाखविणारच !
By admin | Published: April 26, 2017 11:39 PM2017-04-26T23:39:06+5:302017-04-26T23:39:06+5:30
रामराजे नाईक-निंबाळकर : पवारवाडीतील सभेत सणसणीत इशारा, माझा राजकीय जन्मच बंडखोरीतून
फलटण : ‘सांगलीच्या तुरुंगातून सुटून आलेल्या व ज्याचे घरातील व्यक्तीशीही पटत नाही, अशा माणच्या माणसाला तालुक्यात थारा देऊ नका, माझ्यावर राजकीय पेक्षा वैयक्तिक टीका करणाऱ्यांना तुम्ही जाब विचारला पाहिजे. माझा राजकीय जन्मच बंडखोरीतून झाला आहे. त्यामुळे आमदार जयकुमार गोरेंसारख्या माणसाला त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही,’ असा सणसणीत इशारा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिला.
पवारवाडी (ता. फलटण) येथे आयोजित करण्यात आलेल्या नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक दादाराजे खर्डेकर, आमदार दीपक चव्हाण, पंचायत समिती सभापती रेश्मा भोसले, उपसभापती शिवरुपराजे खर्डेकर आदी उपस्थित होते
रामराजे म्हणाले, ‘संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सर्वांपर्यंत मनमिळावू काम सुरू केले आहे. २५ वर्षे त्यांनी तालुक्याची सेवा केली आहे. अनेक दौरे यशस्वी केले आहेत. ग्रामीण भागातील सोसायट्या, ग्रामपंचायती व अन्य संस्थांमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू असून, त्यांनी केलेल्या कामाची हीच खरी पोच पावती आहे. माझ्या राजकीय यशामध्ये माझे भाऊ व ज्येष्ठ नेते दादाराजे यांचाही मोठा वाटा आहे.
सध्या राज्यामध्ये अनेक राजकीय उलथापालथ सुरू असून, त्यात आपल्या जिल्ह्याने माजी मंत्री शरद पवार यांच्यावर प्रेम दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दाखवली. परंतु ज्यांनी काँग्रेसची संस्कृती नीट जोपासली नाही त्यांनीच नाश करायला सुरुवात केली. त्या माजी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला राजकीय शहाणपण शिकवू नये.
ज्या चिमणराव कदमांनी तालुक्यात राजकारण केले त्यांची ग्रामपंचायतही वाईट प्रवृत्तीकडे गेल्याने आपल्या मनाला वाईट वाटत आहे. त्यामुळे नको त्या माणसाच्या हातात सत्ता देऊ नका. तालुक्यात धोम-बलकवडीचे पाणी आणले, विविध विकासकामे केली. २५ वर्षे सत्ता आमच्या ताब्यात दिली, आमच्यावर मोठा विश्वास दाखवला त्यामध्ये प्रामुख्याने पूर्व भागाची नेहमीच साथ मिळाली, असे रामराजे म्हणाले. (प्रतिनिधी)
शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावे...
‘ज्या सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्याला समृद्ध करण्याचे आश्वासन दिले होते. त्या सरकारने तूर, कांदा, पालेभाज्यांचे दर पाडले ते सरकार काय करणार? ज्या शरद पवारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडले होते. शेतकरी महत्त्वाचा घटक मानून कार्य केले त्या शरद पवारांची किंमत जनतेला कळली आहे. शरद पवारांनी पंतप्रधान व्हावे, ही आमची इच्छा आहे. तालुक्यात विकासाची गंगा पोहोचवणाऱ्या शरद पवारांचा फलटण तालुका कायमच ऋणी आहे,’ असेही रामराजे यांनी सांगितले.