'...त्यांना ६ महिन्यांत जागा दाखवू'; प्रीतीसंगमावरून शरद पवारांचा एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 06:01 AM2023-07-04T06:01:53+5:302023-07-04T06:02:04+5:30
महाराष्ट्राला पुन्हा प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी आता नवीन पिढी तयार करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
- दीपक शिंदे
कऱ्हाड (जि. सातारा) : ‘देशातील सर्वसामान्यांचा लोकशाहीचा अधिकार काढून घेणे आणि जातीय दंगली घडविण्याचे काम सुरू आहे. राज्यातही अशाच प्रकारची यंत्रणा कार्यरत आहे. त्यांना पुढील सहा महिन्यांत येणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवू,’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
महाराष्ट्राला पुन्हा प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी आता नवीन पिढी तयार करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. कऱ्हाड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला सोमवारी अभिवादन करून पवार यांनी राष्ट्रवादीची नवी भूमिका स्पष्ट केली. यावेळी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह युवा नेते रोहित पवार, रोहित पाटील आणि प्रतीक पाटील हेही उपस्थित होते.
सोबत कोण होते?
कऱ्हाड येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळावर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिवादन केले. यावेळी हजारो समर्थकांसह आमदार शशिकांत शिंदे, दीपक पवार, आमदार बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, अनिल देशमुख आदी उपस्थित होते.
आता फक्त माझाच आवाज...
प्रीतीसंगमावरती कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांचा जयघोष केला जात होता. यावेळी पवारांनी सर्वांना शांत करत, शांत बसा, कोणी बोलू नका. आता फक्त माझाच आवाज, असे बोलल्याने सर्वत्र शांतता पसरली. मात्र, त्यातून त्यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे, हेदेखील सर्वांना कळले.
यशवंतराव चव्हाण हे तुमचे, आमचे सर्वांचे गुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात जनमत तयार करण्याचे काम पुढच्या काळात करायचे आहे. ते त्यांचा आशीर्वाद घेऊनच करणार आहोत. यासाठी त्यांना वंदन करून महाराष्ट्राच्या नवीन कामाला सुरुवात करीत आहे. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस