‘कृष्णा’ची सत्ता हिसकावून घेऊ : शरद पवार

By admin | Published: February 21, 2016 12:52 AM2016-02-21T00:52:59+5:302016-02-21T00:59:58+5:30

कऱ्हाडात राजकीय टोलेबाजी : अविनाश मोहितेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; दक्षिणेतील विरोधकांचा शेलक्या शब्दात समाचार

Will take away the power of Krishna: Sharad Pawar | ‘कृष्णा’ची सत्ता हिसकावून घेऊ : शरद पवार

‘कृष्णा’ची सत्ता हिसकावून घेऊ : शरद पवार

Next

कऱ्हाड : ‘काही लोक पक्षात येतात आणि काम झालं की निघून जातात. मागच्या वेळेलाही छत्रपतींनी सांगितले म्हणून अतुल भोसलेंना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. निकाल अनुकूल लागला नाही; पण त्यानंतर या पठ्ठयानं मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवण्याऐवजी भाजपशी संपर्क ठेवला. शब्द पाळायचा असतो, हे ज्यांना माहीत नाही अशा लोकांच्या हातात आज कृष्णा कारखान्याची सत्ता गेली आहे. जी योग्यवेळी हिसकावून घेऊ,’ असा सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
वाठार, ता. कऱ्हाड येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी आपल्या समर्थकांसह शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर अध्यक्षस्थानी होते. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव पाटील, आमदार प्रभाकर घार्गे, मानसिंगराव नाईक, राजेश पाटील-वाठारकर, सारंग पाटील, कऱ्हाडच्या नगराध्यक्षा संगीता देसाई, सुनील माने आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शरद पवार म्हणाले, ‘कऱ्हाड दक्षिणच्या कार्यकर्त्यांनी आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवंगत विलासराव पाटील-वाठारकर यांनी मला नेहमीच साथ दिली. त्यांच्यानंतर कमकुवत झालेल्या राष्ट्रवादीला सावरण्यासाठी अविनाश मोहितेंसारखा विनम्र व्यक्तिमत्त्व आज पक्षाला लाभला आहे. हा मतदारसंघ ‘लय भारी’ आहे. विलासकाकांनाही आठवत नसेल; पण त्यांना पहिल्यांदा आमदार करताना त्यांच्या पाठीशी मीच होतो. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात श्रीनिवास पाटलांना निवडून आणण्यात मीच आहे. श्रीनिवास आल्यावर परिवर्तन होऊ शकतं, तर अविनाश आल्यावर का नाही, असं म्हणत इजा, बिजा झाले आहे आता तिजाही करून दाखवू.’
‘नुकत्याच झालेल्या कारखाना निवडणुकीत अविनाश मोहितेंनी निवडणूक यंत्रणेवर विश्वास ठेवला म्हणून हा निकाल लागला. आता आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. बदल झाल्याशिवाय राहणार नाही. यापूर्वी ज्यांना आम्ही पक्षात घेतले, त्यांनी शब्द पाळला नाही; पण नवीन कारखाना काढताना माझ्याकडे दिल्लीला चकरा कुणी मारल्या? त्यांच्या प्रत्येक अडचणीला कोणी मदत केली? याची उत्तरे त्यांनी द्यावीत. आता ऊसदर नियंत्रक मंडळावर डॉ. सुरेश भोसलेंची निवड झाल्याची बातमी कानी पडली. आधी अविनाश मोहितेंनी शेतकऱ्यांच्या उसाला जसे चांगले व चढते भाव दिले. तसे चढते भाव द्या,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यात व केंद्रात शेतकऱ्यांची गंमत पाहणारे सरकार आहे. यांच्या आमदारांना शेतकऱ्यांची आत्महत्या फॅशन वाटत आहे. अशा सरकारला शेतकऱ्यांनीच जागा दाखविण्याची गरज आहे.’
अविनाश मोहिते म्हणाले, ‘मला आबासाहेब मोहितेंचा वारसा आहे. म्हणून तर आम्ही लोकांसोबत आणि लोक आमच्यासोबत आहेत. २०१० मध्ये कृष्णेची निवडणूक लढविली आणि जिंकली. हा अनेक मातब्बरांना आश्चर्याचा धक्का होता; मात्र त्याहीपेक्षा मोठा आश्चर्याचा धक्का म्हणजे नुकत्याच झालेल्या कृष्णेच्या निवडणुकीचा निकाल मानावा लागेल. राजकीय सत्तेचा आणि शासकीय यंत्रणेचा कसा दुरुपयोग करायचा, याचं ते ज्वलंत उदाहरण मानावं लागेल. आजवर कऱ्हाड दक्षिणेत देवाच्या आळंदीला जायचं, असे म्हणून इथल्या नेत्यांनी नेहमीच लोकांना ‘वाममार्गाला’ नेण्याचे काम केले आहे,’ असा टोला नाव न घेता उंडाळकरांना लगावला. ‘मात्र, आता शरद पवारांच्या रूपाने आपल्याला पांडुरंग भेटला असून, दक्षिणेत राष्ट्रवादीची ताकद वाढल्याशिवाय राहणार नाही.’
कऱ्हाड जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
खटक्यावर बोट ठेवा : शशिकांत शिंदे
कृष्णा कारखान्यात राष्ट्रवादी काँग्रेसला माननाऱ्या संचालकांचे संख्याबळ मोठे आहे; पण आज हा कारखाना भाजपच्या ताब्यात असल्याचा भास केला जात आहे, असे सांगत माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी जयंत पाटलांकडे बघून, ‘आता एकदा खटक्यावर बोट दाबा आणि जाग्यावर पलटी करा,’ अशी कोपरखळी मारली. तोच धागा पकडत शरद पवारांनी आपल्या भाषणात ‘योग्य वेळी कृष्णेची सत्ता हिसकावून घेऊ,’ असे इशारावजा सूतोवाच केले.

Web Title: Will take away the power of Krishna: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.