निवडणुकीत गुंतलेले नेते दुष्काळाकडे पाहणार का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 10:17 PM2024-04-17T22:17:13+5:302024-04-17T22:18:41+5:30
खटाव - माणमध्ये १०१ गावांना १०९ टँकरद्वारे पाणी
शेखर जाधव/वडूज : खटाव - माण तालुक्यातील जनावरांसह माणसांच्या पिण्याच्या पाण्याची भीषण कमतरता जाणवू लागली आहे. सद्यस्थितीत पेयजल टंचाई निवारणार्थ १०१ गावांना १०९ टँकरद्वारे पाण्याचे वाटप सुरु आहे. तर टँकर व गावांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामुळे संबंधित प्रशासनाला पाणी उपलब्ध करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करणे महाकठीण बनत आहे. पण, निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेल्या नेत्यांना या परिस्थितीकडे पाहण्यास वेळ नाही.
अपुऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे खटाव - माण तालुक्यात यावर्षी पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची चणचण प्रामुख्याने जाणवू लागली आहे. त्यातच सद्यस्थितीत उरमोडी, जिहे-कटापूर व तारळी पाणी साठ्याचे प्रमाण कमी आहे. खटाव - माणला वरदायिनी ठरणाऱ्या जिहे-कटापूर सिंचन योजनेचे पाणी येरळा नदी व माणगंगेला प्रवाहित केले असते तर हे पाण्याचे भीषण संकट उद्भवले नसते, असे जाणकारांमधून मत व्यक्त होत आहे. दोन्ही तालुक्यातील सिंचन योजनेद्वारे येणारे पाणी याबाबत दुजाभाव झाल्याच्या चर्चा खटाव तालुक्यात सुरु आहेत. शेतीसाठी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी खटाव तालुका पाणी संघर्ष समितीने आवाज उठवून प्रशासनाला वेठीस धरले होते. या आंदोलनाचे फलित म्हणून उशिरा का होईना खटाव तालुक्यात अत्यल्प पाणी सोडण्यात आले.पाण्याअभावी शेतीपिके करपून गेली. तर सध्या जनावरे व माणसांच्या पाण्यासाठी दोन्ही तालुक्यांतील जनतेची भटकंती सुरु आहे.
खटाव तालुक्यातील ६८ हजार लोकांना पाणीबाणी
खटाव तालुक्यातील ४१ गावे आणि १०७ वाड्या-वस्त्यांमध्ये ६७ हजार ९६४ बाधित लोकसंख्या व १२ हजार ८९२ बाधित पशुधन असल्याने २९ खासगी टँकर व दोन शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. यामध्ये मांजरवाडी , गोसाव्याचीवाडी, मांडवे, पेडगाव, गोपूज, सातेवाडी, नवलेवाडी, मोळ, राजापूर, रणसिंगवाडी, रेवलकरवाडी, पांढरवाडी, हिंगणे, तडवळे, एनकूळ, डांभेवाडी, कणसेवाडी, धारपुडी, गादेवाडी, दरुज, खटाव, गारवडी, आवळे पठार, जाखणगाव, औंध, भोसरे, लोणी, कोकराळे, अंभेरी, शिंदेवाडी, कानकात्रे, ढोकळवाडी, कलेढोण, जायगाव, कामथी, उंबरमळे, शिंदेवाडी कटगुण, कातळगेवाडी, धोंडेवाडी, पळसगाव, दातेवाडी, अनफळे, पडळ अशा गावांमध्ये दैनंदिन ६७ टँकर खेपा सुरू आहेत. तर यासाठी १९ विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत .
माण तालुक्यात १ लाख लोकसंख्येला पाणीटंचाई
माण तालुक्यात १ लाख ८ हजार ८७५ बाधित लोकसंख्या व १ लाख ६२५० बाधित पशुधन आहे. एकूण ६० गावे आणि ३७० वाड्या-वस्त्यांना ७८ टँकर द्वारे १५१ दैनंदिन टँकर खेपामधून पाणी वाटप करण्यात येत आहे. तर यासाठी २६ विहिरी आणि इंधन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. दोन्ही तालुक्यातील उन्हाचा पारा ४० शी ओलांडत चालला असून, पाण्याची पातळी मृत साठ्याच्याही खाली गेली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस दुष्काळाचे सावट गडद होत चालले आहे.
जिल्ह्यातील पाणी साठ्याचे सुयोग्य नियोजन केले असते तर ही वेळ खटाव - माण तालुक्यावर आलीच नसती, अशी टीका खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत आहे. पाण्यासाठी दाहीदिशा फिरणारी जनता तर लोकसभेच्या प्रचारासाठी स्वहित जोपासत मेळावे घेणारे राजकीय नेते असे विदारक चित्र सध्या खटाव - माण तालुक्यात दिसून येत आहे .
दुष्काळाचे गडद सावट....राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष
खटाव व माण तालुक्यात १०१ गावे आणि ४७७ वाड्यांमधील १ लाख ७६ हजार ८३९ बाधित लोकसंख्या व १ लाख १९ हजार १८२ बाधित पशुधनासाठी १०९ टँकरद्वारे दैनदिन २४४ खेपांमधून पाणी वाटप करण्यात येत आहे. तर दोन्ही तालुक्यांत एकूण ४५ विहिरी आणि इंधन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खटाव - माण तालुक्यावर दुष्काळाचे सावट गडद होत चालले आहे.