कोणी लावतेय फ्लेक्स, कोणी करतंय सत्कार; शिंदे गट दाखवणार का राजकीय चमत्कार?

By प्रमोद सुकरे | Published: August 25, 2022 08:26 PM2022-08-25T20:26:32+5:302022-08-25T20:26:47+5:30

कराड शहर व तालुका हा दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने प्रभावित झालेला आहे. त्यामुळे पहिल्यापासूनच इथे शिवसेनेची ताकद ही मर्यादितच राहिली आहे. आता तर सेनेतच ठाकरे आणि शिंदे गट पडल्याने येथील शिवसैनिकांच्यातही दोन भाग पडले आहेत.

Will the Shivsena Shinde group show a political miracle in Karad? | कोणी लावतेय फ्लेक्स, कोणी करतंय सत्कार; शिंदे गट दाखवणार का राजकीय चमत्कार?

कोणी लावतेय फ्लेक्स, कोणी करतंय सत्कार; शिंदे गट दाखवणार का राजकीय चमत्कार?

googlenewsNext

प्रमोद सुकरे

कराड - शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलले आहे.  अजून बदलतही आहे. सेनेत उभी फूट पडल्याने त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. त्याचे प्रत्यंतर कराडातही येऊ लागले आहे. येथे मुळच्या शिवसेनेत दोन गट पडले आहेतच पण त्याचबरोबर इतर काही युवा नेते नव्या पदाधिकाऱ्यांचे फ्लेक्स लावत आहेत तर कोणी सत्कार करीत आहेत. त्यामुळे कराडात शिवसेनेचा शिंदे गट काही राजकीय चमत्कार करणार का? कराडला मुळ धरणार का? की या सार्या बाबी फक्त वाऱ्यावरची वरात ठरणार? याबाबत तालुक्यात  उलट सुलट चर्चा आहेत.

कराड शहर व तालुका हा दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने प्रभावित झालेला आहे. त्यामुळे पहिल्यापासूनच इथे शिवसेनेची ताकद ही मर्यादितच राहिली आहे. आता तर सेनेतच ठाकरे आणि शिंदे गट पडल्याने येथील शिवसैनिकांच्यातही दोन भाग पडले आहेत. त्यामुळे पुढे काय होणार? याबाबत लोकांच्या संभ्रमावस्था आहे. अशा परिस्थितीत कराडचे काही युवा नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. त्याच्या पाऊलखुणाही काही निमित्ताने दिसून येत आहेत. नुकतेच शिंदे गट शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी शरद कणसे यांची निवड झाली. त्यांच्या या निवडीनंतर युवा नेते रणजीत पाटील मित्र परिवाराच्या वतीने शहरात ठिकठिकाणी त्यांच्या अभिनंदनाचे फलक झळकत आहेत. तर त्याच कणसे यांचा माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव मित्र परिवाराच्या वतीने शहरात सत्कार सोहळाही झाला. त्यामुळे कराडकरांच्या भुवया उंचावलेल्या दिसत आहेत.

वास्तविक रणजीत पाटील हे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. तर राजेंद्रसिंह यादव हे खासदार उदयनराजे भोसले समर्थक म्हणून परिचित आहेत. मात्र त्यांच्या या राजकीय गुगलींमुळे तर्क वितर्कांना उधान आलेले आहे.

त्यावेळीही फ्लेक्सवर होते फोटो

काही दिवसांपूर्वी रणजीत पाटील यांचा वाढदिवस साजरा झाला. त्यावेळी शहरात शुभेच्छा फलक लागले होते. त्यापैकी काही फ्लेक्सवर माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची छबी होती तर काही फ्लेक्सवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छबीही झळकत होती. त्यामुळे कराडकर कोड्यात पडत आहेत.

निरीक्षकांच्या दिमतीला होती ''सिंह''सेना 

दोन महिन्यापूर्वी कराडात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील काही माजी नगरसेवक निरीक्षक म्हणून  पाठवले होते. त्यावेळी त्यांच्या दिमतीला माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र'सिंह' यादव सेना प्रकर्षाने दिसत होती. त्यावेळपासून उलट सुलट चर्चा सुरूच आहेत.

कोण प्रवेश करणार?

मध्यंतरी राजेंद्रसिंह यादव मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करून आले आहेत. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना कराडचे निमंत्रण पण दिले म्हणे. पण आता शिंदे कराडला कधी येणार? आणि त्या कार्यक्रमात कोण कोण युवा नेते प्रवेश करणार? हा उत्सुकतेचा विषय आहे.

Web Title: Will the Shivsena Shinde group show a political miracle in Karad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.