क-हाडच्या हितासाठी संधीचा वापर करणार - प्रणव ताटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 11:48 PM2020-02-08T23:48:47+5:302020-02-08T23:49:53+5:30
क-हाड तालुक्यात काम करायला चांगला वाव आहे. पंचायत समितीत येणाऱ्या प्रत्येकाला आपुलकीची वागणूक मिळाली पाहिजे, अशी माझी धारणा आहे. येणा-या लोकांची कामे त्वरित झाली पाहिजेत, यासाठी प्रयत्न करणार आहे. - प्रणव ताटे, सभापती, क-हाड पंचायत समिती, क-हाड
प्रमोद सुकरे।
क-हाड : क-हाड तालुका हा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कºहाडचा नावलौकिक देश पातळीपर्यंत पोहोचला आहे. तोच नावलौकिक कायम टिकविण्यासाठी मला मिळालेल्या संधीचा मी उपयोग करणार आहे. कºहाड तालुक्याचे स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, यशवंत घरकूल योजना आदीमध्ये चांगले काम आहे. ते अधिक चांगले व प्रभावी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
प्रश्न : क-हाड पंचायत समितीच्या सभापतिपदाची जबाबदारी आपण कशी पेलणार ?
उत्तर : राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यामुळे मला ही काम करण्याची संधी मिळाली आहे. क-हाड दक्षिण व उत्तर अशा दोन मतदारसंघांचा समावेश असल्याने पंचायत समितीच्या कामाचा व्याप मोठा आहे. मात्र, नेत्यांचे मार्गदर्शन व सध्या राज्यात आपल्याच विचाराचे सरकार असल्याने तालुक्यातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लागतील, असा मला विश्वास आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याने काही अडचणी येतील, असे मला वाटत नाही.
प्रश्न : पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचारी यांच्याबद्दल तुमचे मत काय?
उत्तर : पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी व प्रत्यक्ष काम करणारे अधिकारी, कर्मचारी हे एका रथाची दोन चाके मानली जातात. ती बरोबर चालली की काम व्यवस्थित होते. क-हाड पंचायत समिती मोठी असल्याने येथील कर्मचाऱ्यांना कामाचा ताण मोठा आहे. तरीही त्यांच्याकडून अधिक चांगल्या प्रमाणात काम करून घेण्यासाठी, प्रशासन गतिमान करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- सरपंच समितीची बैठक लवकरच
ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक गतिमान व्हावे, यासाठी सरपंच समिती स्थापन करून त्याच्या बैठका घेतल्या जात होत्या. मध्यंतरीच्या कालावधीत यात खंड पडला असला तरी त्या बैठकांना लवकरच पूर्वरत सुरू करू. त्यामुळे ग्रामपंचायतीचे प्रश्न आम्हाला समजतील व त्यावर उपाय शोधणेही सहज सोपे होईल.
गाववार दौरा लवकरच करु
- क-हाड पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या जातात. मात्र, सगळेच लोक पंचायत समितीपर्यंत पोहोचू शकतात, असे मला वाटत नाही. त्यामुळे या योजना नागरिक व लार्भार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व सर्वसामान्यांच्या अडअडचणी सोडविण्यासाठी मी लवकरच गाववार दौरा करणार आहे. तसेच त्यांना या समस्यातून बाहेर काढणार आहे.