पवनचक्की कंपन्यांकडून वणवे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2015 10:27 PM2015-12-30T22:27:41+5:302015-12-31T00:33:15+5:30

मोरणा पठारावरील प्रकार : लाखोंची वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी

Windmills! | पवनचक्की कंपन्यांकडून वणवे!

पवनचक्की कंपन्यांकडून वणवे!

googlenewsNext

पाटण : पर्यावरण रक्षणाची कसलीही बांधिलकी आणि भान नसलेल्या पवनचक्की कंपन्यांच्या व्यवस्थापनाने सध्या मोरणा पठारावरील डोंगरांना वणवे लावण्याची मालिका सुरू केली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या जंगलांना धोका निर्माण झाला आहे. या वणव्यांमुळे लाखो रुपये किमतीच्या वनसंपदेची हानी होणार आहे. याबाबत वनविभागाचे कर्मचारी अद्याप तरी बेसावध आहेत.
अगोदरच जंगलव्याप्त पण उंच ठिकाणे पवनचक्की प्रकल्पांसाठी दिली गेली. त्यानंतर प्रचंड प्रमाणात लाकूडतोड करून पठार मोकळे करण्यात आले. आता पवनचक्क्या त्या ठिकाणी गरगर फिरू लागल्या आहेत. मात्र, त्याअगोदर झालेल्या वनसंपदेच्या हानीला जबाबदार कोण, याचे उत्तर कोणाकडेच नाही. आता कब्जा केलेल्या हजारो हेक्टरच्या डोंगरावर पवनचक्की कंपन्यांचे कर्मचारी रात्रीच्या सुमारास वणवे लावत आहेत. लावलेला वणवा तातडीने न विझविता तो तसाच पुढे सरकत गेल्यामुळे आजूबाजूचे जंगल वणव्यात खाक होत आहे.
दरवर्षी अशा प्रकारे वणवे लावले जातात. वाल्मीक पठार, गवळीनगरचा सडा, आंब्रगचा डोंगर आणि रिसवडचा परिसर हा जंगलव्याप्त परिसर आहे. आता अभयारण्यातून दहा किलोमीटर अंतरात कसलेही बांधकाम, उत्खनन किंवा लाकूडतोड, वणवे लावण्यास शासनाने नुकतेच बंधन घातले आहे. तरीसुद्धा पवनचक्की कंपन्यांचे प्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. डोंगरांना वणवे लागल्यास स्थानिक गावकरी आणि वनसंरक्षण समित्या वणवे विझविण्यासाठी धडपडताना दिसतात; मात्र दुसरीकडे पवनचक्की कंपन्यांकडून तसे प्रयत्न होत नाही. वणवे लावण्यास प्रतिबंध केला पाहिजे, अशी मागणी होत
आहे. (प्रतिनिधी)

पवनचक्क्या निसर्गाला घातक

अभयारण्य व जंगलव्याप्त परिसरालगत मोरणा पठारावर अनेक पवनचक्क्या उभ्या आहेत. या पवनचक्क्यांची अजस्र पाती वाऱ्यावर फिरतात. या फिरण्याचा आवाज शेजारी असणाऱ्या गावांत मोठ्या प्रमाणावर येतो. रात्रीच्या वेळी पवनचक्क्यांचा गोंगाट वादळ आल्यासारखा जाणवतो. तसेच रात्रीच्या टॉर्च, सर्चलाइट सुरू असतात. त्याचा परिणाम नजीकच्या जंगलांत राहणाऱ्या प्राणी-पक्ष्यांवर होत आहे.


शेकोट्यांचे रूपांतर वणव्यात

नुकताच पावसाळा सरून हिवाळा सुरू झाला आहे. आता डोंगरावर वाढलेले गवत वाळू लागले आहे. मग रात्रीच्या ड्यूटीवर असलेले पवनचक्की कंपन्यांचे प्रतिनिधी, सुपरवाइझर आणि वॉचमन थंडीपासून बचाव करण्यासाठी डोंगरावर शेकोट्या करतात आणि त्याचे रूपांतर वणव्यात होते.

Web Title: Windmills!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.