एक खिडकी योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:32 AM2021-01-09T04:32:09+5:302021-01-09T04:32:09+5:30
फलटण : फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय ‘एक खिडकी योजना’ कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार ...
फलटण : फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय ‘एक खिडकी योजना’ कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार आर. सी. पाटील यांनी दिली आहे. सध्या तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.
............
प्रतिबंधात्मक कारवाई
सातारा : ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दल अॅक्टिव्ह झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक उपविभागीय कार्यालयामध्ये विशेष शिबिराचे आयोजन करून प्रतिबंधात्मक कारवायांची मोहीम राबविण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत आठशे जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
................
वाहतुकीची कोंडी
सातारा : येथील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असून, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठेतील रस्ता अरुंद असल्याने दुपारी बारापर्यंत आणि सायंकाळी चारनंतर या रस्त्यावरून चारचाकी वाहनांच्या रहदारीस बंदी घालण्यात आली आहे. तरी वाहनांची या ठिकाणी गर्दी होत आहे.
...............
वाहनचालक त्रस्त
सातारा : पुणे-बंगलोर महामार्गावर आनेवाडी येथील टोलनाक्यावर फास्टटॅग असूनही वाहतुकीची कोंडी ही रोजचीच बाब बनली असून, व्यवस्थापन मात्र यावर निष्काळजी दिसत असून, वाहनचालकांकडून संताप व्यक्त होत आहे. तरी फास्टटॅग यंत्रणा सुरळीत सुरू करण्याची मागणी वाहनचालक म्हणून होत आहे.
...............
‘मूकबधिर’मध्ये अभिवादन
सातारा : येथील मूकबधिर विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाईंच्या लेकी, माळी महिला ग्रुपच्या अध्यक्षा कविता फरांदे व त्यांच्या सहकारी उपस्थित होत्या. फरांदे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. मुख्याध्यापिका शोभा गिरमकर यांनी प्रास्ताविक केले.
....................
‘डीजी’त मार्गदर्शन
सातारा : धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, रयत शिक्षण संस्थेच्या सहसचिव प्राचार्य डॉ. प्रतिभा गायकवाड, उपप्राचार्य डॉ. एल. एन. घाटगे, प्रा. अरुण बावडेकर, आदींची उपस्थिती होती.
.......
घरपोच पैसे
सातारा : कोरोनाच्या काळात ही भारतीय टपाल खात्याच्या सातारा विभागामार्फत गरजू लोकांना इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सेवेद्वारे जिल्ह्यातील दहा हजार ७१३ बँक ग्राहकांना २ कोटी ९ लाख २५ हजार घरपोच केले आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली होती.
...............
पालखी मिरवणूक
दहिवडी : टाळ्यांच्या गजरात श्री ब्रह्मचैतन्य यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला समाधी मंदिरात श्रीराम नामाच्या जयघोषात श्रींच्या पादुकांची पालखीतून मंदिर प्रदक्षिणेसाठी निघाली अन् भक्तिमय वातावरण अधिकच फुलून गेले. शुक्रवारी पहाटे समाधीवर गुलाल फुलांची उधळण करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मात्र यंदा या सोहळ्यावर मर्यादा असल्याने भाविकांची गर्दी टाळूननच सर्व विधी करण्यात आहेत.
................................
शेतकऱ्यांच्या पोटात गोळा
खटाव : खटाव तालुक्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या अवेळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील शेतकरी कधी ढगाळ वातावरण, तर कधी गारठा, तर कधी पाऊस अनुभवत आहे. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पोटात गोळा असल्याचे चित्र आहे.
..............
कांदा लागवडीकडे कल
सातारा : मागील तीन ते चार महिन्यांपासून कांद्याला मिळत असलेला दर शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरत असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे. परिणामी कांदा रोप अर्थात तरव्याची मागणी वाढल्यामुळे दर तेजीत आले आहेत. पूर्वी वाफ्यावर होणारी तरवा विक्री आता फुटावर केली जात आहे.
...........
पक्ष्यांचा वावर
सातारा : येरळवाडी (ता. खटाव) नावाप्रमाणेच कुमठे मापरवाडी (ता. सातारा) तलावातही दुर्मीळ व स्थलांतरित कृष्णबलक पक्ष्यांचे आश्रयस्थान बनला आहे. सध्या या ठिकाणी कृष्णबलकच्या १२ जोड्यांचे आगमन झाले आहे. मायणी येरळवाडी हे तलाव पक्षीप्रेमींसाठी पर्वणी ठरत असतानाच कुमठे तलाव हादेखील आता दुर्मीळ आणि स्थलांतरित कृष्णबलकचे आश्रयस्थान बनले आहे.