सुपनेतील पाणंद रस्ता अखेर खुला
By admin | Published: October 15, 2016 11:46 PM2016-10-15T23:46:32+5:302016-10-15T23:46:32+5:30
शेतकऱ्यांची सोय : मुरूमीकरणामुळे पायपीट वाचणार
कऱ्हाड : सुपने, ता. कऱ्हाड येथील पाणंद रस्ता खुला करण्यात आला असून, रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या रस्त्यामुळे विभागातील शेतकऱ्यांची सोय होणार असून, त्यांची पायपीट वाचणार आहे.
सुपने येथील बांबुगडे शिवार ते ज्योतिर्लिंग मंदिरानजीकच्या नरसोबा शिवारापर्यंत पाणंद रस्ता असून, या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. या रस्त्यावरून पायी चालत जाणेही मुश्कील झाले होते. हा रस्ता खुला करून त्याचे मुरूमीकरण करण्याची मागणी होत होती. त्यानुसार नुकताच हा रस्ता खुला करण्यात आला आहे. त्याचे मुरूमीकरणही करण्यात येणार आहे. रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सरपंच स्वाती माळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पाटील, मंडलाधिकारी पंडित पाटील, तलाठी जाधव, उपसरपंच विनोद शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष हणमंत म्होप्रेकर, बी. के. पाटील, जयवंत पाटील, अरुण पाटील, प्रकाश शिंदे, सूरज शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित
होते.
‘सुपने येथील शिवारामध्ये अनेक पाणंद रस्ते आहेत. काही रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याने संबंधित रस्ते वापरात येत नव्हते. परिणामी, शेतकऱ्यांना पायपीट करीत दुसऱ्या रस्त्याने जावे लागत होते. मात्र, सध्या अनेक रस्ते खुले करण्यात आले आहेत.
तसेच काही रस्त्यांचे मुरूमीकरण करण्यात आले आहे. काही रस्त्यांचे खडीकरण झाले आहे. त्यामुळे संबंधित रस्ता दैनंदिन वापरात येत आहे. गावातील सर्वच पाणंद रस्ते खुले करून त्यांचे मुरूमीकरण करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, अशी ग्वाही बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पाटील यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)