सातारा जिल्ह्णात मेघगर्जनेसह वादळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2016 11:25 PM2016-05-11T23:25:28+5:302016-05-11T23:53:25+5:30
सातारा शहरासह जिल्हा कडाक्याच्या उन्हाने त्रस्त झाला होता. जिल्ह्णातील सर्वच भागात पाणीटंचाई भासत असल्याने लोकांचे वळवाच्या पावसाकडे लक्ष लागून राहिले होते.
सातारा : सातारा शहरासह वाई, खटाव, कोरेगाव तालुक्यांमध्ये बुधवारी सायंकाळी वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. खटाव तालुक्यातील पुसेगाव परिसरात दीड ते पावणेदोन तास पाऊस झाला. कोरेगाव तालुक्यातील साताररोड येथील नारळाच्या झाडावर वीज पडली. सातारा शहरासह जिल्हा कडाक्याच्या उन्हाने त्रस्त झाला होता. जिल्ह्णातील सर्वच भागात पाणीटंचाई भासत असल्याने लोकांचे वळवाच्या पावसाकडे लक्ष लागून राहिले होते. अशातच बुधवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. साताऱ्यात सायंकाळी चारच्या सुमारास काळेढग जमा झाले होते. त्यानंतर साडेसहानंतर काही प्रमाणात पाऊस झाला. त्याचप्रमाणे वाई तालुक्यातही पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.
खटाव तालुक्यातील खटाव, पुसेगाव परिसरात सायंकाळी सातच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. मेघगर्जनेसह सुमारे वीस मिनिटे वादळी वारे अन् पावसाने झोडपून काढले. यामुळे खटावमधील रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत होते. त्यामुळे काही काळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
पुसेगावसह परिसरातही दीड तास मुसळधार पाऊस झाला. पावसाच्या पाण्यामुळे शिवारातील ओढे, नाले भरून वाहू लागले. या परिसरात जलसंधारणाची मोठी कामे झाली असल्याने पहिल्याच पावसात परिसरात पाणी-पाणी झाले होते. सेवागिरी देवस्थानने येरळा पुलालगत खोलीकरण व नवीन बंधारा बांधला आहे. हा पावसाने भरला आहे.
सातारारोडला वीज कोसळली
वाठारस्टेशन : कोरेगाव शहर तालुक्यातील वाठारस्टेशन, देऊर, सातारारोड, किनई, भाले, पिंपोडे बुद्रूक परिसरात बुधवारी चांगला पाऊस झाला. सातारारोड येथील पूरण पोळी वस्तीतील नारळाच्या झाडावर सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास वीज पडली. त्यामुळे झाडाने वरच्या बाजूने पेट घेतला.
सातारारोड, ता. कोरेगाव येथे बुधवारी मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास एका नारळाच्या झाडावर वीज कोसळली.