विंगकरांना प्रतीक्षा चोवीस तास पाण्याची!
By admin | Published: September 17, 2015 10:58 PM2015-09-17T22:58:33+5:302015-09-18T23:37:20+5:30
पाणी योजनेच्या टाकीचे काम बंद : बांधकाम साहित्याची मोडतोड; कामगारांचे पगारही थकित
विंग : मलकापूर, ता. कऱ्हाड येथील चोवीस तास पाणी योजनेमुळे मलकापूर नगरपंचायत अवघ्या काही दिवसांत महाराष्ट्रात नावारूपास आली. कऱ्हाड नजीकच्या विंग ग्रामस्थांनी या योजनेचा आदर्श घेत ही योजना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ग्रामस्थांनी लोकवर्गणी एकत्रित करून योजनेच्या कामाचे थाटामाटात उद्घाटनही केले. काम सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, काही दिवसांनंतर या आनंदावर विरजण पडले.
विंग येथील हे काम थोड्याच दिवसात बंद पडले. तेव्हापासून कामासाठी वापरण्यात येणारे साहित्य वापराविना पडून आहे. आता त्या साहित्याला गंज चढला असून, त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. योजनेतील कामगारांचे पगारही थटले असल्याने त्यांच्याकडून काम बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे बंद पडलेल्या योजनेचे काम पुन्हा कधी सुरू होणार? असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळावे, या उद्देशाने विंग येथील माजी सरपंच वसंतराव शिंदे, उपसरपंच दादासो होगले, हेमंत पाटील आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन चोवीस तास स्वच्छ पाणी योजना गावात आणली. यासाठी गावकऱ्यांनी एक कमिटीही स्थापन करून लोकवर्गणी गोळा केली. तसेच योजनेची ई-निविदाही काढण्यात आली. तीन टप्प्यांत कार्यान्वित करण्यात येणारी ही योजना सध्या बंद अवस्थेत आहे.
तीन टप्प्यांत बांधण्यात येणाऱ्या योजनेमध्ये पहिला टप्पा हा कोयना नदीवरून पाणी उचलण्यासाठी जॅकवेल बांधण्याचा आहे. मात्र, त्या जॅकवेलच्या सर्वात वरील एक प्लेट बांधण्याचे काम अपूर्ण आहे. त्या कामासाठी लागणारे साहित्य हे अस्ताव्यस्त पडले आहे. दुसरा टप्पा हा पाण्याचे शुद्धीकरण करण्याचा आहे. त्यासाठी भिकारखडी या ठिकाणी बांधण्यात येणारी जलशुद्धीकरण इमारतही अपूर्ण अवस्थेत आहे. तर तिसऱ्या व अंतिम टप्प्यात वेताळवाडी येथे पाणी साठविण्याचा असून, या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या टाकीचे काम बंद ठेवण्यात आले आहे.
अपूर्णावस्थेत असलेली पाण्याची टाकी, पाणी शुद्धीकरणाची अपूर्ण इमारत तसेच अस्ताव्यस्त पसरलेले बांधकामाचे साहित्य पाहता, ही अपूर्णावस्थेत असलेली योजना कधी पूर्णत्वास येणार? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी बांधकाम करणाऱ्या कंपनीने तत्काळ बांधकामास सुरुवात करावी, अशी मागणी विंग ग्रामस्थांतून केली जात आहे. दरम्यान, या कामगारांचे मागील महिन्याचे पगारही थकित ठेवण्यात आले असल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. (वार्ताहर )
कंपनी ठेकेदारावर कारवाई व्हावी...
प्रदूषित पाण्यामुळे कावीळ झाल्याची घटना गत महिन्यात या ठिकाणी घडली होती. त्यात एका महिलेला आपला जीवही गमवावा लागला होता. प्रदूषित पाण्याचा प्रश्न ग्रामस्थांच्या जिवावर बेतणार असेल तर या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधीत कंपनी ठेकेदाराने काम दिलेल्या वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. दरम्यान, विंग येथील पाणी योजना केव्हा मार्गी लागणार असा प्रश्न आहे.
चोवीस तास पाणी ही योजना गावासाठी फायद्याची आहे. विंगमध्ये ही योजना राबविण्याचा निर्णय स्तुत्य आहे; पण त्यासाठी जादा वेळ न घेता योजना लवकर पूर्ण होईल, याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे. म्हणजे आम्हाला शुद्ध पाणी मिळेल.
- आनंद विंगकर, ग्रामस्थ, विंग