वाईत सात कृत्रिम कुंड
By admin | Published: September 25, 2015 10:40 PM2015-09-25T22:40:20+5:302015-09-26T00:21:32+5:30
कृष्णाघाटावर प्रशासनाचे नियोजन : गणपती दान करण्याचे आवाहन
वाई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन व वाई पोलीस ठाणे यांच्या शहरातील गणेशोत्सव मंडळाबरोबर नियोजनाच्या आढावा बैठका झाल्या़ त्यामध्ये अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले़ प्रशासनाच्या आवाहनाला गणेश उत्सव मंडळे तसेच सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला़ यामध्ये शहरातील सातही घाटांवर गणपती विसर्जनासाठी कृत्रिम कुंड तयार करून त्यामध्ये गणपती विसर्जनासाठी व्यवस्था केली आहे़ सर्व घाटावर निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्यकुडांची व्यवस्था केली आहे़ नदीपात्रात गणेशाच्या विसर्जनासाठी पाण्याची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे़ धोम धरणाचा उजवा व डावा कालवा महिनाभर वाहत असताना गणपती विसर्जनाच्या दिवसात पाणी नाही. प्रशासनाने लक्ष घालून विसर्जनादिवशी नदीला मुबलक पाणी सोडावे, अशी मागणी वाईमधून होत आहे़ वाई पालिकेतील स्वच्छता कर्मचारी व सुरक्षा रक्षक प्रत्येक घाटावर तैनात करणे, विसर्जनाच्या मिरवणुकीचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक चौकात वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, वाहनतळ, गर्दीच्या वेळी मुख्य बाजारपेठेत अवजड वाहनांना बंदी, एकेरी व दुहेरी वाहतुकीची व्यवस्था करणे हे उपाय केले आहेत. (प्रतिनिधी)
नदी पात्रात पाणी सोडण्याची गरज
धोम धरणातून गेले एक महिनाभर दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले़ तसे गणेश विसर्जनाच्या मुख्य दिवसांना नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे़ या लोकभावनेचा विचार करून विसर्जन काळात प्रशासनाने नदीला पाणी सोडावे अशी मागणी नागरींमधून केली जात आहे़
विसर्जनासाठी गणपती घाट, गंगापुरी घाट, धुंडीविनायक घाटावरचे नैसर्गिक कुंड स्वच्छ केली आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी गणेशमूर्ती दान कराव्यात. स्वच्छतेबाबत जागृत राहून निर्माल्य कुंडामध्येच टाक ावे़
- आशा राऊत, मुख्याधिकारी वाई नगरपालिका वाई
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसआरपीएफच्या तुकडया, पोलीस मुख्यालयाचे कर्मचारी, होमगार्ड असे शंभर कर्मचारी शहरात तैनात असणार आहेत़ शहरात गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांना जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई केली आहे़ मंडळांची बैठक घेऊन विसर्जनाच्या दिवसाचे नियोजन केले आहे़
- रमेश गलांडे
पोलीस निरीक्षक वाई