वाईत लिपिक जाळ्यात
By Admin | Published: September 1, 2014 10:57 PM2014-09-01T22:57:36+5:302014-09-01T23:02:33+5:30
१0 हजाराची लाच : भूमिअभिलेख कार्यालयात सापळा
वाई : येथील भूमिअभिलेख कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असणाऱ्या कृष्णात यशवंत मुळीक (वय ४५, रा. जेजुरीकर कॉलनी, वाई) यास फाळणी नकाशा नकल काढून देण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास एका कारमध्ये पैसे घेताना ही कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी, कृष्णात मुळीक सातारा येथील भूमिअभिलेख कार्यालयात कार्यरत होता. त्यावेळी त्याला एका बँकेच्या निवृत्त अधिकाऱ्याने कोंडवे (ता. सातारा) येथील गट नंबर १७९ चा फाळणी नकाशा काढून देण्यासाठी अर्ज दिला होता. त्यावेळी मुळीक याने त्यांच्याकडे १२ हजारांची मागणी केली होती. त्यानंतर मुळीकची बदली वाई भूमिअभिलेख कार्यालयात झाली. त्यावेळी तक्रारदार यांनी मुळीकशी संपर्क साधला असता ‘तुमची कागदपत्रे माझ्याकडे आहेत. तुम्ही ती घेण्यासाठी वाईला या. तुमचे काम झाले आहे.’ असे सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास वाई येथील मिशन हॉस्पिटल रोडवर कार (एमएच ११ एके ९९७८) मध्ये दहा हजारांची लाच घेताना मुळीकला रंगेहाथ पकडले. पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी. एस. कुरळे व पथकाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी)