नव्या मैत्रिपर्वाला वेध विजयाच्या ‘हॅट्ट्रिक’चे !
By admin | Published: June 26, 2015 10:02 PM2015-06-26T22:02:25+5:302015-06-26T22:02:25+5:30
कऱ्हाडची बदलती राजकीय समीकरणे : जिल्हा बँक, ‘कृष्णा’ कारखान्यानंतर आता लक्ष बाजार समितीवर
प्रमोद सुकरे - कऱ्हाड -काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून उंडाळकर व भोसले या दोघांचाही पराभव झाला. आपल्या मतविभागणीचा फायदा दुसऱ्यालाच होतोय, हे कळून चुकल्यानंतर ‘कोयने’चे पेढे अन् ‘जयवंत शुगर’ची साखर एकमेकांना भरवत नव्या मैत्रिपर्वाला सुरुवात झाली. जिल्हा मध्यवर्ती बँक व कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत मैत्रिपर्वाला यशही मिळालंय. त्यामुळे या दोन्ही गटांनी आता येऊ घातलेल्या बाजार समिती निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असून, विजयाची हॅट्ट्रिक मारण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे.
दिवंगत जयवंतराव भोसले व माजी आमदार विलासराव पाटील यांचे सख्ख्य तसे खूप जुनेच ! या दोन्ही गटांनी अपवाद वगळता अनेकदा अनेक निवडणुकींत परस्परांना मदतीचा हात दिला आहे; पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच या दोन्ही कुटुंबांतील व्यक्ती एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकल्या; पण तिरंगी लढतीत या दोघांनाही पराभव स्वीकारावा लागला.
राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो, या तत्त्वानुसार झाले गेले सर्व विसरून डॉ. अतुल भोसले व अॅड. उदय पाटील या दोन युवा नेत्यांच्यात नव्या मैत्रिपर्वाला सुरुवात झाली. या मैत्रिपर्वाने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची पहिली परीक्षा दिली. विलासराव पाटील-उंडाळकर या परीक्षेत दहाव्यांदा चांगल्या गुणांनी पास झाले. त्यानंतर कृष्णा साखर कारखान्याची रणधुमाळी सुरू झाली. त्यात उंडाळकरांनी भोसलेंना बिनशर्त पाठिंबा देऊ केला. अटीतटीच्या या तिरंगी लढतीतही मैत्रिपर्वाने बाजी मारली. विधानसभेतील पराभवानंतर या दोन्ही गटांना मिळालेला एक-एक विजय कार्यकर्त्यांना सुखावणारा आहे. त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच चार्ज झाल्याचे दिसतात. ‘इरादा पक्का अन् दे धक्का’ असे फ्लेक्स आता झळकू लागले असून, त्यावर ‘आता लक्ष बाजार समिती..!’ असा आवर्जून उल्लेख केलेला दिसतो. त्यामुळे हे दोन्ही नेते विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी फिल्डिंग लावून बसलेत, हे नक्की !
उंडाळकरांची संघटना पुन्हा एकवटणार ?
उंडाळकर-भोसले या दोन नेत्यांनी नव्या मैत्रिपर्वाला सुरुवात केली खरी; पण हे मैत्रिपर्व सर्वच उंडाळकर समर्थकांना पचनी पडल्याचे दिसले नाही. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत उंडाळकरांची संघटना काहीशी विस्कळीत झाल्याची दिसली; पण बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही संघटना पुन्हा एकवटणार का ? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
वडिलांच्या विजयासाठी मुलांची धडपड
जिल्हा बँक निवडणुकीसाठी विलासराव पाटील उभे होते. तर कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले उभे होते. त्यामुळे आपल्या वडिलांच्या विजयासाठी अॅड. उदय पाटील व डॉ. अतुल भोसले यांनी प्रयत्नांची पराकष्ठा केली. त्याचीच चर्चा कार्यकर्त्यांच्यात आहे.
‘सह्याद्री’ची निवडणूक पथ्यावर
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची यंदा निवडणूक झाली. खरं तर धूर्त असणाऱ्या उंडाळकरांनीच ती पडद्यामागे राहून लावली. त्यात विरोधकांचा पराभव झाला. आमदार बाळासाहेब पाटील यांचे पॅनेलच विजयी झाले. मात्र ही निवडणूक लागणेच उंडाळकरांच्या पथ्यावर पडले. जिल्हा बँक निवडणुकीतही त्याचा उंडाळकरांना फायदा झाला. बाजार समितीच्या निवडणुकीतही त्याचा या नव्या मैत्रिपर्वाला फायदा होईल, असे मानले जाते.