उत्तरेकडील थंड वाऱ्याने साताऱ्यात गारठा, शेकोट्या पेटू लागल्या
By नितीन काळेल | Published: December 22, 2023 01:41 PM2023-12-22T13:41:39+5:302023-12-22T13:42:48+5:30
मागीलवर्षीपेक्षा थंडी कमीच
सातारा : उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्याने जिल्हाही गारठला आहे. त्यामुळे लोकांच्या अंगातून स्वेटर निघेना अशी स्थिती आहे. तर साताऱ्याचा पारा १५ अंशावर कायम आहे.
जिल्ह्यात यावर्षी थंडीला उशिरा सुरूवात झाली. डिसेंबर महिन्याच्या मध्यावर सुरू झालेली थंडी वाढत गेली. त्यानंतर थंडीत उतार आला. तरीही मागील १२ दिवसांपासून जिल्हावासीयांना चांगलीच थंडी जाणवत आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून किमान तापामानात वाढ झाली असलीतरी उत्तरेकडून थंड वारे वाहत आहेत. यामुळे हवेत गारठा कायम राहत आहे. परिणामी दिवसभर अंगातून थंडी जाईना अशी स्थिती आहे. परिणामी शहरातील नागरिकांना ऊबदार कपडे परिधान करुनच बाहेर पडावे लागत आहे.
सातारा शहरातही गारठा कायम आहे. शहराचा पारा १५ अंशावर आहे. शुक्रवारी १५.३ अंशाची नोंद झाली. तर मागील आठवड्यात १३.२ अंशापर्यंत पारा घसरला होता. यावर्षातील हे नीच्चांकी तापमान ठरले. यामुळे लोकांना चांगलीच हुडहुडी भरुन राहिली. त्यानंतर पारा वाढून १८ अंशावर पोहोचला होता. तर थंड हवेच्या महाबळेश्वरलाही थंडी कायम आहे. शुक्रवारी पारा १६ अंशापर्यंत पोहोचला होता. त्यातच थंडगार वारे वाहत असल्याने कडाक्याची थंडी जाणवत आहे. या थंडीचा आनंद पर्यटक घेत आहेत. तर सायंकाळच्या सुमारास शहरातील बाजारपेठेत पर्यटकांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे.
दरम्यान, या थंडीचा परिणाम ग्रामीण भागात चांगलाच जाणवत आहे. कारण, पहाटेपासून गारठा वाढत आहे. यामुळे सकाळी नऊपर्यंत थंडी जाणवत आहे. परिणामी शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. शेतकरी वर्ग तर दुपारच्या सुमारास शेतीची कामे करत आहे. या थंडीचा फायदा पिकांना होणार आहे. तसेच ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्याचे दिसत आहे. असे असलेतरी यावर्षी मागीलवर्षीपेक्षा थंडी कमी असल्याचे दिसत आहे.
सातारा शहरातील किमान तापमान असे :
दि. १० डिसेंर १७.५, ११ डिसेंबर १७, १२ डिसेंबर १७.४, १३ डिसेंबर १५.४, १४ डिसेंबर १५.३, १५ डिसेंबर १३.२, दि. १६ डिसेंबर १३.५, १७ डिसेंबर १८.५, १८ डिसेंबर १६.५, १९ डिसेंबर १५.१, २० डिसेंबर १५.१, २१ डिसेंबर १६.६ आणि दि. २२ डिसेंबर १५.३