कऱ्हाडात लिलावाअभावी गाळे पडून !
By admin | Published: October 29, 2015 11:23 PM2015-10-29T23:23:25+5:302015-10-30T23:22:29+5:30
पालिकेचा कारभार : १९६पैकी ४३ गाळ्यांचे लिलाव; उर्वरित १५३ ची प्रतीक्षा, पाच वर्षांपूर्वी बांधली इमारत
कऱ्हाड : येथील कऱ्हाड पालिकेच्या वतीने भाजी मंडईतील विक्रेत्यांची सोय व्हावी या हेतूने छत्रपती शिवाजी भाजी मंडईची इमारत बांधली. पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये स्वतंत्र १९६ गाळे बांधण्यात आले. त्यापैकी फक्त ४३ गाळ्यांचे लिलाव होऊन ते सुरू झाले. मात्र, अजून १५३ गाळे लिलावाअभावी बंद आहेत. इतर गाळ्यांचे लिलाव हे होणे गरजेचे आहे. मात्र, पालिकेकडून मंडई सुरू करण्यात आल्यापासून आतापर्यंत गाळ्यांचे लिलाव करण्यात आले नाहीत. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान पालिकेला सोसावे लागले आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून कऱ्हाड पालिकेने २०११ मध्ये गुरुवार पेठ येथे शिवाजी भाजी मंडईची इमारत बांधली. १९६ गाळे असलेल्या इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आले. दोन मजली इमारतीतील आतील आणि बाहेरील बाजूस १९६ गाळे काढण्यात आले. मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल या हेतूने बांधण्यात आलेल्या १९६ गाळ्यांपैकी सुरुवातीला १३१ गाळ्यांचे लिलाव झाले. उर्वरित ६५ गाळ्यांचे लिलाव झाले नाहीत. लिलाव झालेल्या १३१ गाळे धारकांपैकी पाच वर्षात फक्त ४३ गाळेधारकांनी पैसे भरले. लिलावातील बाकी राहिलेले ८८ गाळे व उर्वरित ६५ गाळे अशा १५३ गाळ्यांचे पुर्नलिलाव करण्याचे बाकी आहे.
ते लिलाव कधी केले जाणार अशी विचारणा नागरिक व व्यापाऱ्यांकडून होत आहे. लिलावा अभावी व भाजी मंडई इमारतीसमोरील अतिक्रमणामुळे पालिकेतील गाळे पडून आहेत.
पालिकेने गाळेधारकांना लिलावातील रक्कम भरण्याबाबत गेल्या पाच वर्षांत अनेकवेळा नोटिसांद्वारे सूचना केल्या आहेत. २०११ ते २०१५ या पाच वर्षांत गाळेधारकांनी अनामत रक्कम अपेक्षित अशी भरली नाही. तसेच काहींकडून आजतागायत काहीच रक्कम भरली गेली नसल्याचे व्यापाऱ्यांमधून सांगितले जाते. पाच वर्षांत पालिकेतील सर्व गाळ्यांचे लिलाव का होऊ शकले नाही. लिलावाबाबत एकाही नगरसेवकाने सभागृहात प्रश्न का उपस्थित केला नाही. याचे संशोधन करणे गरजेचे आहे.
गाळेधारकांना सवलत देण्याच्या दृष्टीने पालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत गाळेधारकांना ३० सप्टेंबर पर्यंत मुदत वाढवून दिली होती. त्यानुसार व्याजासह थकबाकी भरण्याच्या सूचना केल्या होत्या. गाळे वाटपाअभावी पालिकेचे पाच वर्षांत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
याला जबाबदार कोणास धरले पाहिजे. पालिका प्रशासनाला की, लोकप्रतिनिधींना अशी शहरातील नागरिकांकडून विचारणा होत आहे. (प्रतिनिधी)
नियोजित जागेवर अजूनही काम अपूर्ण
नवीन भाजी मंडई इमारतीच्या बाजूला असणाऱ्या मोठ्या जागेवर पालिकेकडून इतरही इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे. अशी माहिती एक वर्षापूर्वी पालिकेकडून मंडई परिसरातील व्यापारी व नागरिकांना देण्यात आली होती. मात्र, त्या जागेवर आजही फक्त मुरूम आणि दगड पडलेले आहे. याठिकाणी सध्या किरकोळ विक्रेत्यांनी आपली दुकाने उभारलेली आहेत.
२०१० ला बांधकाम पूर्ण
येथील नवीन भाजी मंडईच्या इमारतीचे बांधकाम २०१० मध्ये पूर्ण करण्यात आले. आता २०११ पासून ते आतापर्यंत पाच वर्षे मंडई इमारतीमधील गाळे लिलावा अभावी पडूनच राहिले.