मराठी विश्वकोशाच्या स्थापनेपासूनचे साक्षीदार हरपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 10:44 PM2018-11-20T22:44:45+5:302018-11-20T22:44:53+5:30

मराठी विश्वकोशाचे निवृत्त विभाग संपादक डॉ. सु. र. तथा सुरेश रघुनाथ देशपांडे हे ‘भैयासाहेब’ म्हणून प्रसिद्ध. त्यांचा जन्म कागल ...

Witness from the beginning of the Marathi Vishwakosh | मराठी विश्वकोशाच्या स्थापनेपासूनचे साक्षीदार हरपले

मराठी विश्वकोशाच्या स्थापनेपासूनचे साक्षीदार हरपले

googlenewsNext

मराठी विश्वकोशाचे निवृत्त विभाग संपादक डॉ. सु. र. तथा सुरेश रघुनाथ देशपांडे हे ‘भैयासाहेब’ म्हणून प्रसिद्ध. त्यांचा जन्म कागल येथे झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कागल येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथून घेतल्यानंतर ‘यादव शिल्पशैली’ या प्रबंधावर त्यांनी डेक्कन कॉलेज पुणे येथून पीएच. डी. संपादन केली. यानंतर त्यांनी १९५९-६४ पर्यंत शिक्षक, प्राध्यापक म्हणून नोकरी केली. पुढे त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विश्वकोशात नोकरीस सुरुवात केली आणि वाई ही त्यांची कर्मभूमी झाली. सन १९६४ ते २०१८ म्हणजे अगदी अखेरपर्यंत म्हणजे ५४ वर्षे त्यांनी मराठी विश्वकोश निर्मितीला वाहून घेतले. मराठी विश्वकोशाच्या १ ते २० खंडांत त्यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांनी सेवानिवृत्तीनंतरही सहसंपादक, विभाग संपादक ही पदे लीलया पेलली.
यादव स्कल्प्चर (इंग्रजी), मराठेशाहीचे आधुनिक भाष्यकार, भारतीय गणिका, सरस्वती दर्शन, पेशवेकालीन पुणे, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, प्राचीन भारतीय शिल्पवैभव, भारतीय कामशिल्प, वाई : कला आणि संस्कृती, आदी १७ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले. ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार मिळाला. त्यांची अनेक पुस्तके विविध विद्यापीठांच्या अभ्याससूचीत समाविष्ट झाली. मराठी विश्वकोशात हजारो नोंदींचे लेखन-समीक्षण त्यांनी केले. ‘लव इन स्टोन’ हे त्यांचे अलीकडे प्रसिद्ध झालेले इंग्रजी पुस्तक. गोवा राज्यातील मराठी विश्वचरित्र कोशातही त्यांनी सन्माननीय लेखक, संपादक, सल्लागार म्हणून काम केले. याशिवाय आकाशवाणीसह नियतकालिकांतून प्रसंगोपात स्फूटलेखन केले.
मराठी विश्वकोशात आद्यसंपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यापासून मे. पुं. रेगे, प्रा. रा. ग. जाधव, डॉ. श्रीकांत जिचकार, डॉ. विजया वाड ते विद्यमान प्रमुख संपादक दिलीप करंबेळकर यांच्यापर्यंत त्यांनी लेखन, संपादनाचे काम अव्याहत केले. वयाच्या ८२ व्या वर्षीही तरुणाला लाजवेल अशी त्यांची रोज सलग आठ तास अभ्यासाची बैठक आणि काम करण्याची पद्धत होती. २०११ मध्ये रुजू झालेल्या आम्हा सर्व तरुण संपादकांना त्यांनी सहज आपलेसे करून नेहमी मार्गदर्शन केले. प्रेमळ स्वभाव, नेहमी मदतीची तयारी, उंच व देखणी शरीरयष्टी, सडपातळ बांधा, सतत उत्साही व हसरा चेहरा ही भैयासाहेबांची बलस्थाने होती. माझाही संपादनाचा प्रमुख विषय इतिहास असल्याने भैयासाहेब मला अगदी जवळ होते. नोंदीतील कोणतीही शंका ते सप्रमाण सिद्ध करत व निर्भीड, सडेतोड प्रतिक्रिया देत. याचा अनेक ज्येष्ठ लेखकांनाही अभिमान वाटत असे. ज्येष्ठ इतिहासकार ग. ह. खरे हे त्यांचे मार्गदर्शक, तर ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव त्यांचे वर्गमित्र. इतिहासाबरोबर ज्योतिष व हस्तरेषांमधील त्यांचा अभ्यास वाखाणण्याजोगा होता; पण कर्मकांडे त्यांना मान्य नव्हती. गेल्या महिन्यापासून त्यांची प्रकृती थोडी अस्वस्थ होती; पण तरीही भ्रमणध्वनीवरून त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या नेहमी आम्ही संपर्कात होतो. दिवाळीनंतर मी एक दिवस वाईत येतो, मग आपण भेटूया, असे त्यांनीच मला आश्वस्त केले होते. डिसेंबरपासून मी कार्यालयात येईन, नोंदी काढून ठेवा, अशा सूचनाही त्यांनी मला केल्या होत्या. मात्र, आज भैयासाहेब गेल्याचे कळले आणि मी स्तब्ध, सुन्न झालो, माझा आधारवड कोसळला, दीपस्तंभ हरविला, मी एक इतिहास गमविला.
- सरोजकुमार सदाशिव मिठारी, विद्याव्यासंगी सहायक संपादक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ.
विचार करायला लावणारी मांडणी
भैयासाहेब आयुष्यात नेहमी स्पष्ट भूमिकेत जगले. प्रसिद्धीपासून दूर राहून या इतिहासकाराने भारतीय प्राचीन, मध्ययुगीन व मराठेशाही यांची जी मांडणी केली, ती इतिहासप्रेमींसह सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे. त्यांचे ‘मराठेशाहीतील मनस्विनी’ हे पुस्तक म्हणजे मराठा इतिहासातील महिलांच्या कर्तृत्वाचे सोनेरी पान ठरेल.

Web Title: Witness from the beginning of the Marathi Vishwakosh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.