घाटातलं एस वळण आता झोकात...
By Admin | Published: July 2, 2015 09:42 PM2015-07-02T21:42:21+5:302015-07-02T21:42:21+5:30
महामार्गावर सोयी : ‘खंबाटकी’च्या वळणावर संरक्षक कठडे
दशरथ ननावरे - खंडाळा --पुणे-सातारा मार्गावरील खंबाटकी घाट व बोगदा परिसरातील रस्त्याच्या सोयी सुविधांबाबत स्थानिकांनी अनेकदा हायवे प्रशासनाकडे मागणी केली होती. याबाबत उशिरा का होईना प्रशासनाला जाग आल्याचे दिसून येत आहे. घाटाबरोबरच विशेषत: इंग्रजी ‘एस’ आकाराच्या वळणावर संरक्षक कठडे उभारून प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, याबाबत ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखलही घेण्यात आली.
खंबाटकी घाटातील बोगदा ओलांडल्यानंतर तीव्र उतार व अतिशय धोकादायक वळणे आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग या ठिकाणी आपोआपच वाढला जातो. त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडल्याची अनेक उदाहरणे आहेत. विशेषत: इंग्रजी ‘एस’ आकाराच्या वळणावर जीवघेणे मोठे अपघात घडले होते. याचठिकाणी झालेल्या खासगी बसच्या अपघातात ११ जण ठार तर ३५ जण जखमी झाले होते. तर जीपच्या अपघातात ९ जण ठार झाले होते. मालट्रकच्या अपघातात दोघे तर दुचाकी अपघातात १ जणाला प्राण गमवावे लागले होते.
या अपघातानंतर बोगदा परिसरातील रस्त्यातील अशास्त्रीय वळणे, संरक्षक कठड्यांचा अभाव, सूचना फलक याबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत प्रशासनाकडे बैठका घेऊन सोयी उपलब्ध करण्याची मागणीही केली होती. परंतु अपघातानंतर तात्पुरत्या स्वरूपात जागे होणारे प्रशासन काही दिवसांतच पुन्हा झोपी जायचे; परंतु महामार्गाचा सहापदरीकरणाचे काम वेगाने सुरू झाल्यानंतर वळणांवरील सुविधांबाबत सुधारणा झाली आहे. या वळणावर रेड सिग्नल लावला आहे. तसेच लोखंडी संरक्षक कठडे उभारण्यात आले आहेत. तसेच डांबरीकरणावर रबर स्ट्रीप लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना पुढील धोक्याची सूचना मिळत आहे. तर रबरी स्ट्रीपमुळे वाहनांचे वेगळी नियंत्रित ठेवण्यास मदत होत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाणात घट झाली आहे.
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल...
बोगदा परिसर, ‘एस’ वळणावरील असुविधा घाटातील अडचणी याबाबत ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठविला होता. प्रवाशांच्या, वाहनचालकांच्या अडचणी व सुविधांचा अभाव या सर्वच बाबी ‘लोकमत’ने प्रभावीपणे मांडल्या होत्या. याची दखल घेत हायवे प्रशासनाने योग्य त्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
खंडाळा ग्रामस्थांनी प्रवाशांचे होणारे हाल पाहून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत अनेकदा मागणी केली होती. त्याचा पाठपुरावा आम्ही करत आलो. या ठिकाणच्या त्रुटी लक्षात आणून दिल्यानंतर प्रशासनाने संरक्षक कठडे उभारल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान आहे. उर्वरित घाटातील सुविधाही तातडीने कराव्यात.
-अनिरुद्ध गाढवे, सदस्य, पंचायत समिती खंडाळा.
‘एस’ वळणावर सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने कोणत्या बाबी कराव्यात, यासाठी हायवेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार रबर स्ट्रीप, सूचनेसाठी सिग्नल लावले होते. आता सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी कठडे उभारल्याने प्रवास सुखर होऊ शकतो. तरीही वाहनचालकांनी वेग मर्यादा पाळली पाहिले.
- अशोक शेळके, पोलीस निरीक्षक खंडाळा