सातारा: मिसाळवस्तीत लांडग्यांनी नऊ शेळ्यांचा पाडला फडशा, नुकसानभरपाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 16:28 IST2022-06-30T16:15:25+5:302022-06-30T16:28:08+5:30
शेळ्यांच्या वाडग्याभोवती लावलेल्या लोखंडी जाळीखालून खड्डा उकरून लांडग्यांनी हल्ला चढवला. यात सहा शेळ्या जागेवरच फस्त केल्या.

सातारा: मिसाळवस्तीत लांडग्यांनी नऊ शेळ्यांचा पाडला फडशा, नुकसानभरपाईची मागणी
वरकुटे-मलवडी : कुरणेवाडी, ता. माण येथील मिसाळ वस्ती येथे राहणाऱ्या दगडू आबाजी मिसाळ या मेंढपाळाच्या सहा शेळ्या आणि तीन बोकडं मिळून नऊ शेळ्यांचा लांडग्याने फडशा पाडला असून, दोन शेळ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. यामध्ये हातावर पोट असणाऱ्या मेंढपाळाचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याने कुरणेवाडीसह वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल, बुधवारी (दि.२९) रात्री दीड ते दोनच्या सुमारास रिमझिम पाऊस पडत असल्याने दगडू मिसाळ आपल्या कुटुंबासह घरात झोपले होते. काळाकुट्ट अंधारामुळे झालेली सामसुम आणि रिमझिम पावसाचा फायदा घेत घराशेजारी असलेल्या शेळ्यांच्या वाडग्यावर चार-पाच लांडग्यांनी हल्ला केला. शेळ्यांच्या वाडग्याभोवती लावलेल्या लोखंडी जाळीखालून खड्डा उकरून लांडग्यांनी हल्ला चढवला. यात सहा शेळ्या जागेवरच फस्त केल्या, तर तीन बोकडं घेऊन काही लांडगे पसार झाले. दोन शेळ्यांच्या मानेसह पोटाचे लचके तोडल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने परिसरात असणारे मेंढपाळ धास्तावले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच गाव कामगार तलाठी गणेश म्हेत्रे यांच्यासह वरकुटे-मलवडी येथील पशुवैद्यकीय पशुधन पर्यवेक्षक नितीन कार्तिक स्वामी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर वनखात्यातील देवापूर विभागाचे वनरक्षक हनुमंत बालटे यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेचा पंचनामा व नुकसानीची माहिती घेऊन या घटनेचा अहवाल वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे.
अचानक घडलेल्या घटनेने परिसरात राहणाऱ्या शेतकरी बांधवांकडून हळहळ व्यक्त होत आहे, तर काबाडकष्ट करीत शेळीपालनावर उदरनिर्वाह करणाऱ्या मेंढपाळास दीड लाख रुपयांची नुकसानभरपाई शासनाकडून मिळावी, अशी मागणी कुरणेवाडीचे सरपंच उमेश आटपाडकर यांनी केली आहे.