‘सीबीआय’ अधिकारी असल्याचे भासवून तरुणीने घातला गंडा
By Admin | Published: July 28, 2015 11:29 PM2015-07-28T23:29:32+5:302015-07-28T23:29:32+5:30
तरुणाची फिर्याद : पोलिसात नोकरीच्या आमिषाने उकळले दोन लाख
सातारा : आपण ‘सीबीआय’ अधिकारी असल्याचे भासवून तरुणाला पोलिसात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणीने दोन लाखांना गंडा घातल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. विशेष म्हणजे, संशयित तरुणीनेच आधी या तरुणाविषयी तक्रार दाखल केली होती आणि त्यातही आपण ‘सीबीआय’ अधिकारी असल्याचे म्हटले होते.
अरुणा रामचंद्र नलवडे (वय २७, रा. न्हाळेवाडी, ता. सातारा) असे संशयित तरुणीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी तिने सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे एक लेखी तक्रार नोंदविली होती. ‘एक युवक मला सतत फोन करतो आणि त्रास देतो,’ असे तिने तक्रारीत म्हटले होते. संबंधित तरुणावर कारवाई केली जावी, असे तिने नमूद केले होते. या तक्रारीत तिने आपण ‘सीबीआय’ अधिकारी आहोत, असे म्हटले होते.
तक्रारीनुसार गुन्हे शाखेने तपास सुरू केल्यावर वेगळीच माहिती हाती लागली. पोलिसांनी संबंधित मुलाला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणून त्याचा जबाब घेतला. आपण अरुणाला फोन करतो, हे त्या तरुणाने मान्य केले; मात्र ते तिला त्रास देण्यासाठी नव्हे, तर आपले काम कुठवर आले आहे हे पाहण्यासाठी करीत होतो, असे त्याने सांगितले. अरुणा ‘सीबीआय’ अधिकारी असल्याचे तिने आपल्याला सांगितले होते आणि पोलिसात नोकरी देण्यासाठी तिने आपल्याकडून दोन लाख रुपये उकळले, असा जबाब त्याने दिला. पोलिसांनी शहानिशा करण्यासाठी अरुणाला बोलावून घेतले आणि खरा प्रकार उघड झाला.
यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला पोलीस वैशाली घाडगे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक साबळे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
‘सीबीआय’चे व्हिजिटिंग कार्ड
तरुणाचा जबाब घेतल्यानंतर जेव्हा पोलिसांनी अरुणाला भेटण्यास बोलावले, तेव्हा तिने आपण ‘सीबीआय’ मध्ये असिस्टंट कमिशनर असल्याचे सांगितले. याचा काही पुरावा आहे का, असे विचारताच तिने व्हिजिटिंग कार्ड दाखविले. कार्डवरील माहितीची स्थानिक गुन्हे शाखेने शहानिशा केली असता, हे कार्डही बोगस असल्याचे उघडकीस आले आणि अरुणाचे पितळ उघडे पडले. दरम्यान, न्यायालयाने अरुणाला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.