वादळी वाऱ्यामुळे शिवसागरच्या जलाशयातच महिलेची प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:40 AM2021-02-24T04:40:03+5:302021-02-24T04:40:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बामणोली : बामणोली व तापोळा हा परिसर येथील निसर्गसंपदेने नटलेला. परिसरातील अनेक गावे कडेकपाऱ्यात वसलेली. गावे ...

A woman gave birth in Shivsagar reservoir due to strong winds | वादळी वाऱ्यामुळे शिवसागरच्या जलाशयातच महिलेची प्रसूती

वादळी वाऱ्यामुळे शिवसागरच्या जलाशयातच महिलेची प्रसूती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

बामणोली : बामणोली व तापोळा हा परिसर येथील निसर्गसंपदेने नटलेला. परिसरातील अनेक गावे कडेकपाऱ्यात वसलेली. गावे व वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आजही साध्या कच्च्या रस्त्याचीही सोय नाही. दुसरीकडे शिवसागर जलाशया पलीकडे असणाऱ्या कांदाटी, सोळशी व कोयना अशा तीन खोऱ्यातील लोकांचे दळणवळण तर पूर्णपणे पाण्यातूनच होत आहे. वादळी वारे, अतिवृष्टी अशावेळी येथील जीवनचक्र पूर्णपणे ठप्प होते. गरोदर स्त्रिया व वृद्ध आजारी पेशंट यांना आजही डोलीतूनच पक्क्या रस्त्यापर्यंत पोहचवावे लागते. रविवारी अशीच एक थरारक घटना शिवसागर जलाशयाच्या कांदाटी खोऱ्यात घडली .

रविवारी दिवस रात्र बामणोली तापोळा परिसरात वादळी वारे वाहत होते. त्यामुळे पाण्यातून लाँच चालविणे कठीण होते. पिंपरी तांब या गावच्या एकता जाधव या महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. रात्रीच्या १ वाजता गावकरी लॉंचेतून तापोळा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे या महिलेला नेऊ लागले, कारण सदर महिलेचे गाव तापोळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येते. बामणोलीच्या जवळ आल्यावर लाँच वाऱ्यामुळे चालविता येत नव्हती. तेव्हा काही ग्रामस्थांनी बामणोलीच्या डॉक्टर मोरेंना फोन केला. त्यांनी झोपेतून उठून व सोबत पवार व पाडवी या नर्सना घेऊन रात्री दीड वाजता दोन कि.मी. चालत नदीकिनारी पोहोचले. रुग्णाची लाँच वाऱ्यामुळे किनाऱ्यावर पोहोचत नसल्यामुळे मोरे डॉक्टरांनी बामणोली बोट क्लबची एक लाँच घेऊन त्या लाँचेपर्यंत पोहचून पाण्यातच त्या महिलेची यशस्वीपणे प्रसूती केली. आपल्या कार्यक्षेत्रातील रुग्ण नसतानाही शिवाय वादळी वारे व पाण्यातून रात्रीचा प्रवास करून स्वतःचा जीव धोक्यात घालून या आदर्श प्रामाणिक डॉक्टरांनी या महिलेचा जीव वाचवून यशस्वी प्रसूती केली. याबद्दल मोरे डॉक्टरांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोट

" मी कायमस्वरूपी निवासी बामणोली आरोग्य केंद्रात सहकुटुंब असतो. रविवार असल्यामुळे मी जेवण करून झोपी गेलो होतो. रात्री १ वाजता अचानक फोन आल्यामुळे मी क्षणाचाही विलंब न करता निवासी असणाऱ्या पवार व पाडवी या दोन नर्सना घेऊन वादळी वाऱ्यातून दुसऱ्या लाँचेतून पोहोचून सदर महिलेची यशस्वी प्रसूती केली."

डॉ. ज्ञानेश्वर मोरे,

प्राथमिक आरोग्य केंद्र. बामणोली

" रात्रीच्या वेळी माझ्या नाती ला प्रसूती वेदना सुरू झाल्या. वादळी वारे वाहत होते अशा वेळी काय करावे सूचत नव्हते. डॉक्टर ज्ञानेश्वर मोरे देवासारखे स्वतःचा जीव धोक्यात घालून धावून आले व त्यांनी माझ्या नातीला वाचविले. त्यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत.

श्रीमती जाधव, रुग्णाची आजी

फोटो

ज्ञानेश्वर मोरे यांचा सत्कार पिंपरीच्या श्रीमती जाधव यांनी करून धन्यवाद दिले.

Web Title: A woman gave birth in Shivsagar reservoir due to strong winds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.