Satara: कार अपघातात महिला ठार, पाच जण जखमी; गुरु पौर्णिमेनिमित्त देवदर्शन करुन परतताना घडली दुर्दैवी घटना
By दीपक शिंदे | Published: July 22, 2024 12:05 PM2024-07-22T12:05:01+5:302024-07-22T12:05:58+5:30
कऱ्हाड (जि. सातारा) : देवदर्शनाहून परतताना चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार रस्त्याकडेच्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात एक महिला ठार, ...
कऱ्हाड (जि. सातारा) : देवदर्शनाहून परतताना चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार रस्त्याकडेच्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात एक महिला ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले. शेडगेवाडी ते कऱ्हाड मार्गावर ओंड, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत सोमवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
जयश्री संतोष मोरे (वय ४२, रा. होम समर्थ सोसायटी, सानपाडा, सेक्टर ५, नवी मुंबई) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे, तर संतोष शंकर मोरे (रा. सानपाडा, सेक्टर ५, नवी मुंबई), विकास वसंत भोसले (रा. भांडुप, मुंबई), शैला संजय कदम, माधुरी लोंढे (दोघीही रा. कुर्ला, मुंबई) व गिरीश सूर्यकांत गुहागरकर (रा. विक्रोळी, मुंबई) हे जखमी झाले आहेत.
नवी मुंबई येथील संतोष मोरे हे पत्नी जयश्री यांच्यासह इतरांसोबत कारने गुरुपौर्णिमेनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथील कार्यक्रम झाल्यानंतर ते सर्व जण रात्री पुन्हा मुंबईला जाण्यासाठी शेडगेवाडी ते कऱ्हाड मार्गाने कऱ्हाडकडे येत होते. गिरीश गुहागरकर हा कार चालवीत होता.
सोमवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ओंड गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्याच्या उजव्या बाजूस जाऊन रस्त्यानजीकच्या खड्ड्यात पलटी झाली. त्यामध्ये सर्वजण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच जयश्री मोरे यांचा मृत्यू झाला.