दोन गटांतील संघर्षात महिलेचा खून
By Admin | Published: January 28, 2015 11:16 PM2015-01-28T23:16:30+5:302015-01-29T00:09:24+5:30
कवठे येथील घटना : कपडे, साहित्य अस्ताव्यस्त; मृतदेह उसात फेकला
कवठे : पारधी समाजातील दोन गटांत झालेल्या संघर्षात एका महिलेचा खून झाल्याची घटना आज, बुधवारी उघडकीस आली. महिलेचा मृतदेह उसाच्या शेतात फेकल्याचे आढळून आले, तर दोनपैकी एका गटातील लोकांचे सामानसुमान अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आल्याने दोन गटांतील संघर्षात महिलेचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.
याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, येथील तळेपाळी शिवारातील जमीन शंकर आप्पा डेरे यांची असून, ती गहाणखताद्वारे कृष्णराव डेरे कसत आहेत. या जमिनीत ऊस लावला असून, त्यात एका महिलेचा मृतदेह आढळल्याची फिर्याद जितेंद्र शंकर डेरे यांनी भुर्इंज पोलीस ठाण्यात दिली. पोलीस घटनास्थळी आले असता या महिलेचा श्वासोच्छ््वास सुरू असल्याचे दिसून आले. तिला तातडीने कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, राजपारधी समाजाचे सुमारे दीडशे लोक या शिवारात दोन ते तीन दिवस मुक्कामाला होते. त्यांचे दोन गट होते. दोन्ही ठिकाणी १७ चुली आढळून आल्या. अरविंद नामदेव डेरे यांच्या शेतात राहत असलेल्या गटाच्या मुक्कामाच्या ठिकाणी भांडी व अन्य साहित्याची मोडतोड झाल्याचे दिसून आले. त्यावरून या ठिकाणी दोन गटांत मारामारी झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला.
घटनास्थळापासून पाचशे फूट अंतरावर उसाच्या आठव्या सरीत महिलेचा मृतदेह आढळून आला. त्या ठिकाणची ओली व सुकी माती पोलिसांनी ताब्यात घेतली. तसेच घटनास्थळी लाकडी दांडके व चेपलेली भांडी आढळून आली. यावरून एका गटाने पलायन केले असावे आणि दुसऱ्या गटातील लोकांनी महिलेला उसात नेऊन टाकले असावे, असा अंदाज आहे. सहायक पोलीस निरीक्षक एन. व्ही. पवार व इंगवले यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याकामी विलास डेरे, मिलिंद जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजेंद्र पोळ, तुषार भागवत, जितेंद्र डेरे यांनी सहकार्य केले. सोपस्कार पूर्ण झाल्यावर मृतदेहाचे दफन करण्यात आले. (वार्ताहर)
निरगुडीच्या डहाळ््यांचे रहस्य
या दोन गटांच्या राहण्याच्या ठिकाणापासून मृतदेह सुमारे पाचशे फूट अंतरावर ज्या ठिकाणी टाकण्यात आला होता, तेथपर्यंतच्या मार्गावर निरगुडीचे डहाळे आढळून आले आहेत. हे डहाळे १५ ते २० फुटांच्या अंतराने ठेवण्यात आले होते. त्यावरून माग काढतच पोलीस खुनाच्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकले. मात्र, हे डहाळे कुणी आणि कशासाठी ठेवले होते, याचा शोध आता घेतला जात आहे.