‘त्या’ महिलेसह तिघांवर खंडणीचा गुन्हा

By admin | Published: January 23, 2017 11:40 PM2017-01-23T23:40:15+5:302017-01-23T23:40:15+5:30

जयकुमारांच्या पीएची फिर्याद : विनयभंग प्रकरणाला वेगळे वळण शक्य

'That' woman's ransom crime for three | ‘त्या’ महिलेसह तिघांवर खंडणीचा गुन्हा

‘त्या’ महिलेसह तिघांवर खंडणीचा गुन्हा

Next



सातारा : माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचे पीए अभिजित काळे यांच्या तक्रारीवरून दहिवडी पोलिस ठाण्यात एका महिलेसह तिघांवर तक्रार दाखल करण्यात आली. प्रदीप जाधव (दहिवडी), विवेकानंद सावंत (नवी मुंबई) आणि सातारा येथील महिलेवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३८५ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल झाल्याने आमदार गोरेंवर दाखल असलेल्या विनयभंग प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
आमदार जयकुमार गोरे यांच्यावर महिलेचा विनयभंग, मोबाईलवर अश्लील मॅसेज पाठविणे हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी आमदार गोरे यांना अटकपूर्व जामीन नाकारण्यात येऊन अटकही झाली होती. संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच सोमवारी आमदार गोरे यांचे पीए अभिजित काळे यांनी प्रदीप जाधव, विवेकानंद सावंत आणि सातारा येथील एका महिलेविरोधात तक्रार दाखल केली.
अभिजित काळे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, आमदार जयकुमार गोरे यांनी विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोहनराव कदम यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. या निवडणुकीत शेखर गोरे यांचा पराभव झाला. त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न दुसऱ्यांदा धुळीस मिळाले. त्यामुळे विरोधक आमदार गोरेंना खोट्या केसमध्ये अडकवून त्यांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात होते. त्याचाच एक भाग म्हणून प्रदीप जाधव यांनी माझ्याशी संपूर्ण साधून व दहिवडी येथे समक्ष भेटून तुम्ही विवेकानंद सावंत यांना ठराविक द्या. रक्कम न दिल्यास आम्ही आमदार गोरेंना एका महिलेच्या मदतीने खोट्या केसमध्ये अडकवून त्यांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करू, असे सांगितले. प्रदीप जाधव यांच्या सांगण्यावरून मी विवेकानंद सावंत यांच्याशी नवी मुंबई येथील रघुलीला मॉलमधील रेस्टॉरंटमध्ये चर्चा केली. मला त्यांनी मोठ्या रकमेची मागणी केली. आमदार गोरे यांचे सातारा जिल्ह्यातील विरोधक त्या महिलेला मोठ्या रकमा देण्याचे आश्वासन देत आहेत, असे सावंत यांनी मला सांगितले. त्यानंतर प्रदीप जाधव यांनी मला दहिवडी येथे सावंत यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत पुढे काय झाले, अशी विचारणा केली. लवकर रक्कम देऊन विषय संपवा, असेही सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी त्या महिलेने मला व्हॉटस्अ‍ॅपवर मेसेज करुन भेटण्यासंदर्भात विचारले. १ आॅक्टोबर २०१६ रोजी मला सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे भेटण्यास बोलविले. त्यावेळी महिलेने सावंत यांच्याशी झालेली चर्चा परत नसल्याचे व लीगल प्रोसेस करण्याची धमकी दिली, अशाप्रकारे प्रदीप जाधव, विवेकानंद सावंत आणि महिलेने संगनमत करुन आमदार गोरेंना खोट्या केसमध्ये अडकविण्याची भीती घालून, मोठ्या रकमेची मागणी करुन वसूल करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराबाबत अभिजित काळे यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात ब्लॅकमेलिंग व खंडणीची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी भारतीय दंडसंहिता १८६० नुसार कलम ३२५ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करून घेतला. या गुन्ह्याच्या तपास सहायक पोलिस निरीक्षक युवराज हांडे करत आहेत.

Web Title: 'That' woman's ransom crime for three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.